'ही तर हुकूमशाहीच; संसदेवर सरकारचा बुलडोझर चालतोय'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 05:53 AM2023-12-19T05:53:05+5:302023-12-19T05:53:38+5:30
खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभेतील ३३ आणि राज्यसभेतील ४५ विरोधी सदस्यांचे सोमवारी केलेले निलंबन ही ‘हुकूमशाही’ चाल असून, सरकार विरोधकांना चिरडण्यासाठी संसदेवर बुलडोझर चालवत असल्याचे घणाघाती टीकास्त्र ‘इंडिया’ या विरोधी आघाडीतील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर सोडले.
काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ सदस्यांना सोमवारी अवमान केल्याच्या आरोपावरून सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यापैकी ३० सदस्यांना चालू हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, प्रथम घुसखोरांनी संसदेवर हल्ला केला. त्यानंतर केंद्र सरकार संसदेवर आणि लोकशाहीवर हल्ला करत आहे. ४७ खासदारांना निलंबित करून निरंकुश केंद्र सरकारकडून सर्व लोकशाही नियम कचऱ्यात टाकले जात आहेत. विरोधाशिवाय संसदेत केंद्र सरकार आता विरोधकांचा आवाज दाबून, कोणत्याही चर्चेशिवाय महत्त्वाचे प्रलंबित कायदे मंजूर करू शकते, असे खरगे म्हणाले.
‘हा तर सन्मान’
सरकारचा प्रयत्न आहे की, विरोधी पक्षांतील जास्तीत जास्त लोकांना निलंबित करून विधेयक मंजूर करा, असे निलंबित खासदार आणि जनता दल (युनायटेड) नेते कौशलेंद्र कुमार म्हणाले. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा म्हणाले की, ‘लोकशाहीच्या या अंधारात निलंबन ही सन्मानाची बाब आहे. जे सरकार संसद भवनातील सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही, ते गलवानवर काय बोलणार?’ उर्वरित खासदारांनाही निलंबित करा...विरोधकमुक्त संसदेबद्दल अभिनंदन, केंद्र सरकार, असे त्यांनी म्हटले आहे.
१३ डिसेंबर रोजी झालेल्या धोकादायक हल्ल्यानंतर विरोधक गृहमंत्र्यांकडून निवेदनाची मागणी करत होते. त्यामुळे सुरुवातीला १३ खासदारांना निलंबित करण्यात आले. आता इंडिया आघाडीच्या ३३ आणखी खासदारांना निलंबित करण्यात आले. यात अनेक पक्षांचे सभागृह नेतेही आहेत. हे केवळ खासदारांचे निलंबन नाही तर लोकशाहीचे आहे.
-जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस
हे एक हुकूमशाही पाऊल आहे. आम्ही हुकूमशाहीविरुद्ध लढू.
-प्रियांका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना
संसदेतील विरोधी सदस्यांचे निलंबन म्हणजे लोकांचा आवाज दाबणे आहे. खासदारांवरील कारवाई ही लोकशाहीची चेष्टा आहे. ते घाबरले असल्याने त्यांनी एवढ्या खासदारांना निलंबित केले. त्यांनी दोन राज्ये जिंकली म्हणून ते इतके अहंकारी झालेत का?
-ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
काँग्रेस आणि मित्रपक्षांनी लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती यांचा अपमान करून त्यांच्या वर्तनाने देशाला लाजीरवाणे केले. विरोधी सदस्यांनी सदनात फलक आणले. सभागृहात फलक घेऊन येण्याची परवानगी नसल्याचा निर्णय घेऊनही जाणूनबुजून संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणला.
-पीयूष गोयल, भाजप सभागृह नेते, राज्यसभा
या सरकारमध्ये हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. आम्हाला चर्चा करायची होती. मात्र, बहुमताच्या ताकदीच्या जोरावर सर्वांना शांत केले जाईरू, असे सरकारला वाटत आहे.
-अधीर रंजन चौधरी, खासदार