"देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय...", जी २० परिषदेसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 09:53 AM2023-09-10T09:53:04+5:302023-09-10T12:41:32+5:30
जी २० परिषदेसाठी देशातील राज्यांतील मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत दाखल झाले आहे.
नवी दिल्ली : जी २० परिषदेसाठी देशाच्या राजधानीत जागतिक नेत्यांचा कुंभमेळाच जमला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते दिल्लीतील जी २० परिषदेत सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिल्लीत दाखल होणाऱ्या प्रत्येक विदेशी पाहुण्याचे स्वागत केले जात आहे.
दरम्यान, या जी २० परिषदेसाठी देशातील राज्यांतील मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.९) दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गाला डिनर कार्यक्रमालाही एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जी २० देशांची १८ वी शिखर परिषद दिल्लीत पार पडत आहे. या परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी देखील या परिषदेत सहभागी होत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याचबरोबर, आपल्याला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणं ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद.. (०९ सप्टेंबर २०२३) pic.twitter.com/aQ6AkYyDjr
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2023
याचबरोबर, देशाचा सर्वांगिण विकास, चंद्रयानचे यश आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा, यामुळे भारताचा जगभरात लौकिक वाढत आहे. आपली अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या ९ वर्षाच्या काळात अनेक विकासाची कामे देशात झालेली आहेत, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
याशिवाय, जगभरात देशाचं नाव होत असल्यानेच अनेक राष्ट्रप्रमुख दिल्लीत आलेले आहे. देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची देखील भेट घेतली. या भेटीचा फोटो एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री अश्विनी कुमार चौबे हे देखील दिसून येत आहेत.
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या #जी२० परिषदेच्या निमित्ताने #इंग्लंड चे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना याप्रसंगी महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थित होते.… pic.twitter.com/4uDzAoe9uL
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2023