हा आमच्या राजर्षी शाहूंचा पुतळा नव्हे; दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळा बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 07:15 AM2024-07-04T07:15:07+5:302024-07-04T07:15:50+5:30
नूतन खासदार शाहू छत्रपती यांच्यासह अनेक जण नुकतेच या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिल्लीत एकत्र आले होते
समीर देशपांडे
कोल्हापूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुतळा महाराजांच्या व्यक्तिमत्त्वानुसार झाला नसून, तो बदलण्याची मागणी केली जात आहे. सदनामध्ये जाऊन आलेल्या अनेकांनी या पुतळ्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सदनाच्या अग्रभागी शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा आहे. तर परिसरात महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. आतील मोक्याच्या दर्शनी भागात छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. नूतन खासदार शाहू छत्रपती यांच्यासह अनेक जण नुकतेच या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिल्लीत एकत्र आले होते. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या पुतळ्याबाबत नाराजीच्या प्रतिक्रिया वाढल्या आहेत.
हे आहेत दोष
शाहू महाराजांचे व्यक्तित्व हे बलदंड आणि पैलवानी शरीरयष्टीचे होते. ते या पुतळ्यात कुठेही दिसत नाही.
पुतळ्यातील शाहू महाराजांची तब्येत कृश आहे.
खांदे पडलेले असून, आजारपणातून उठल्यासारखा हा पुतळा आहे. डोळे खूपच आत गेलेले आहेत.
बघणारा चुकचुकतोच
दसरा चौकातील पुतळा पाहिलेले जेव्हा महाराष्ट्र सदनातील पुतळा पाहतात, तेव्हा ‘आमचे शाहू महाराज असे नव्हते’, हीच त्यांची प्रतिक्रिया असते.