'असं का होत आहे, याचं आत्मपरिक्षण करण्याची हीच वेळ आहे'; प्रियांका गांधींनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:28 IST2025-01-23T17:26:25+5:302025-01-23T17:28:21+5:30
खासदार आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी वाढत्या विद्यार्थी आत्महत्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. उपाययोजना करण्यासाठी सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे.

'असं का होत आहे, याचं आत्मपरिक्षण करण्याची हीच वेळ आहे'; प्रियांका गांधींनी व्यक्त केली चिंता
कोंचिग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेले कोटा शहर सध्या विद्यार्थी आत्महत्यांमुळेच चर्चेचा मु्द्दा बनले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्यानंतरही विद्यार्थी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. २२ जानेवारी रोजी दोन तासांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी चिंता व्यक्त करत याकडे सरकारचे लक्ष वेधले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०२५ वर्ष सुरू झाल्यानंतर जेईई परीक्षेची तयारी करत असलेल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांनी कोटामध्ये आत्महत्या केली आहे.
खासदार प्रियांका गांधी या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे की, "कोटा, राजस्थानमध्ये एकाच दिवशी दोन मुलांनी आत्महत्या केल्याची बातमी अत्यंत भीतीदायक आणि ह्रदयद्रावक आहे. इथे तीन आठवड्यात ५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. हे खूपच चिंतादायक आहे."
'आपल्या मुलांवर इतका ताण का पडतोय की...'
प्रियांका गांधी यांनी पुढे म्हटलं आहे की, "हे असं का होत आहे, याचं आत्मपरिक्षण करण्याची हीच वेळ आहे आणि शिक्षण संस्था, पालक आणि सरकारांनीही एकत्र येऊन विचार करण्याची. आपल्या मुलांवर इतका ताण पडत आहे का की, ते सहन करू शकत नाहीयेत? की संपूर्ण वातावरणच त्यांना अनुकूल नाहीये?", असे दोन महत्त्वाचे प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
"सरकारने यासंदर्भात ठोस पावले उचलली पाहिजेत. मुलांच्या मानसिकेतचा, शिक्षण आणि इतर गोष्टी, तसेच वातावरण यासंदर्भात सखोल अभ्यास आणि सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत", अशी मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे.
दोन तासांत दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
कोटामध्ये बुधवारी (२२ जानेवारी) दोन तासाच्या काळात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यात एक तरुण आणि एक तरुणीचा समावेश आहे.
सकाळी १० वाजता अफ्शा शेख (वय २३) या तरुणीने पीजी रुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ती सहा महिन्यांपूर्वी कोटामध्ये आली होती.
त्यानंतर दुपारी १२ वाजता पराग (वय १८) नावाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊनच आत्महत्या केली. तो आसामचा होता. पुढील आठवड्यात जेईई मेन परीक्षा आहे.