‘लोकांशी जुळण्याचा हा स्तुत्य प्रयत्न’; सरन्यायाधीशांच्या गुजरातीत भाषणाचे पंतप्रधानांना कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 06:18 AM2024-01-08T06:18:15+5:302024-01-08T06:19:41+5:30
राजकोटमधील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन
राजकोट: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राजकोटमधील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गुजराती भाषेत बोलून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात नर्म विनोदाची पेरणी करत गुजराती समाजाच्या ‘जिलेबी-फाफडा’ प्रेमाविषयीही सांगितले. यावर पंतप्रधाननरेंद्र मोदी स्वत:ला त्यांची प्रशंसा करण्यापासून रोखू शकले नाहीत.
कार्यक्रमादरम्यान चंद्रचूड यांनी गुजरातमधील लोकांमधील सांस्कृतिक वारसा आणि उद्योजकीय भावनेतील अभिमानाच्या अद्वितीय मिश्रणाची प्रशंसा केली. सरन्यायाधीश म्हणाले की, राजकोटचे लोक बदल आणि आधुनिकतेचा अंगीकार करताना त्यांच्या सांस्कृतिक परंपरांशी जोडलेले राहतात. एक गुजराती चहा ब्रेकला बिझनेस स्ट्रॅटेजी मीटिंगमध्ये बदलू शकतो. येथे उद्योजकतेचा अंगभूत भाव जीवनाच्या प्रत्येक अंगात उलगडला जातो. विनोद बाजूला ठेवू, गुजरातच्या प्रगतीचे मूळ सार हेच आहे. संस्कृतीला नावीन्याची सांगड घालण्याची क्षमता हाच खरा विकास आहे.
सरन्यायाधीशांनी गुजरातच्या प्रसिद्ध जिलेबी-फाफडाचाही उल्लेख केला. गुजरातमधील अनेक उद्योगांप्रमाणेच जिलेबी-फाफडाचेही स्थान आहे, असे ते म्हणाले.
एकाच छताखाली ३९ न्यायालये
राजकोटची नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत पाच मजली आहे. यात कोर्ट रूम, न्यायाधीशांसाठी एक खोली, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हॉल, सरकारी वकिलांसाठी खोली, कॅन्टीन, लायब्ररी आणि बार रूम आहे. ही नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत राजकोटच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण यापूर्वी शहरभर पसरलेली ३९ न्यायालये आता एकाच छताखाली काम करणार आहेत.
त्यांना राजकोट चांगले समजले: मोदी
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रचूड यांचे कौतुक केले. एक्सवर एका पोस्टमध्ये चंद्रचूड यांच्या या प्रयत्नाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. एक व्हिडीओ शेअर करताना पीएम मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय सरन्यायाधीशांना राजकोट चांगले समजले आहे! गुजरातीमध्ये बोलण्याचा आणि लोकांशी जोडण्याचा त्यांचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.