पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 21:42 IST2025-04-23T21:41:00+5:302025-04-23T21:42:35+5:30
महत्वाचे म्हणजे, अरब जगतानेही काश्मीरातील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच आपण भारतासोबत ठामपणे उभे आहोत, असे म्हटले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुतांश पर्यटक आहेत. २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा खोऱ्यातील सर्वात मोठा हल्ला आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या सहकारी रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिका, रशिया आणि चीनसह जगभरातील अनेक देशांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. महत्वाचे म्हणजे, अरब जगतानेही काश्मीरातील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच आपण भारतासोबत ठामपणे उभे आहोत, असे म्हटले आहे.
कुवेतचे क्राउन प्रिंस सबा खालिद अल-हमद अल-सबाह यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या पर्यटकांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय, सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पहलगाम हल्ल्यासंदर्भात एक निवेदन जारी करत दुःख व्यक्त केले आणि भारतासोबत उभे असल्याचे म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे, "आम्ही हिंसाचार, दहशतवाद आणि नागरिकांना लक्ष्य करण्याच्या सर्व भ्याड कृत्यांचा निषेध करतो आणि भारतासोबत ठामपणे उभे आहोत. सौदी अरेबिया पीडित कुटुंबांप्रती आणि भारत सरकारप्रती संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करते."
याशिवाय संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) या हल्ल्याचा एक निवेदन जारी करून तीव्र शब्दात निषेध केला आहे. यूएई या भयावह हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांप्रती आणि भारत सरकार तथा जनतेप्रती मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करते व सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामना करते, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
काय म्हणतोय पाकिस्तान? -
यासंदर्भात भाष्य करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे निकटवर्तीय तथा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, "हे सर्व त्यांच्याच घरात सुरू आहे. भारताविरोधात कथित राज्यांमध्ये क्रांती सुरू आहे. एक दोन नव्हे तर डझनावर सुरू आहेत. नगालँडपासून कश्मीरपर्यंत, छत्तीसगडमध्ये, मणिपुरमध्ये असे सुरू आहे. या सर्व ठिकाणी भारत सरकारविरोधात क्रांती होत आहे."