तेरा चरखा ले गया चोर!
By admin | Published: January 14, 2017 05:28 AM2017-01-14T05:28:08+5:302017-01-14T05:28:17+5:30
खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायऱ्यांवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याची तीव्र प्रतिक्रिया
नवी दिल्ली : खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायऱ्यांवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये उमटली आहे. मोदी यांना महात्मा गांधी यांची जागा कधीच घेता येणार नाही, यापासून, त्यांना गांधीजी बनण्याची आणि बनवण्याची इतकी घाई का झाली, असे सवालही काहींनी विचारले.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी तर तेरा चरखा ले गये चोर असेच ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये,
सून ले बापू ये पैगाम, मेरी चिठ्ठी तेरे नाम
या गाण्यांचे शब्द वापरून पुढे
तेरा चरखा ले गया चोर
अशा ओळी जोडल्या आहेत.
बापूंनीच खादी-ग्रामोद्योग आयोगाला रामराम करण्याची वेळ आली आहे. गांधीजी व खादीतील नातेच आयोगाने संपवून टाकले आहे. मोदींना १० लाखांचा सूट आवडतो. स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेली मंडळी खादीचे महत्त्व समजू शकणार नाहीत, असे तुषार गांधी म्हणाले.
मोदींच्या छायाचित्राला शिवसेनेचा विरोध
शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्यावर कायम टीकाच केली आहे. मात्र खादी व ग्रामोद्योगच्या डायरी व कॅलेंडरवर गांधीजींऐवजी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्याच्या निर्णयाला शिवसेनेनेही विरोध केला आहे.
आयोगातील कर्मचारी संघटनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे. मात्र खादी व ग्रामोद्योग आयोगाने आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी खादीचा प्रचार व प्रसार केल्यामुळे खादीच्या वापरात प्रचंड वाढ झाली आणि त्यामुळेच आम्ही त्यांचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेतला, असे आयोगाने म्हटले आहे.