त्या मुस्लिमांना पाकिस्तानची वाट मोकळी
By admin | Published: November 23, 2015 02:52 AM2015-11-23T02:52:47+5:302015-11-23T09:44:52+5:30
भारतात आपला छळ होत आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम पाकिस्तानात जाण्यास मोकळे आहेत, असे वक्तव्य आसामचे राज्यपाला आचार्य यांनी केले
गुवाहाटी : ‘हिंदुस्तान फक्त हिंदूंचाच’ असे वक्तव्य करून नव्या वादाला जन्म देणारे आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी; ‘भारतीय मुस्लीम पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मोकळे आहेत,’ असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य करीत हा वाद अधिकच चिघळवला आहे. या ‘विभाजनकारी’ वक्तव्याबद्दल आचार्य यांना राज्यपालपदावरून हटविण्यात यावे, अशी जोरदार मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली.
आचार्य हे एका राज्याचे संवैधानिक प्रमुख म्हणून काम करण्यापेक्षा ‘आरएसएसचे प्रचारक’ म्हणूनच जास्त काम करीत आहेत, असा आरोप गोगोई यांनी केला. तर आचार्य यांचे हे वक्तव्य आरएसएस आणि भाजपाच्या दादरी हत्याकांडसारख्या घटनांना जन्म देणाऱ्या विभाजनवादी विचारधारेचे निदर्शक असल्याची टीका काँग्रेसने केली.
शनिवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना आचार्य यांनी ‘हिंदुस्तानात फक्त हिंदूच राहू शकतात’ असे वक्तव्य केले होते. रविवारी त्यावर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी दुसरे वादग्रस्त वक्तव्य करून वाद अधिक चिघळविला. ‘देशात आपला छळ होतो आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम कुठेही जाण्यास मोकळे आहेत. पाकिस्तान अथवा बांगला देशात जाण्याची त्यांची इच्छा असेल तर ते तेथे जाण्यास मोकळे आहेत. त्यांच्यापैकी बरेच पाकिस्तानमध्ये गेले आहेत,’ असे आचार्य म्हणाले.