ज्यांनी देशाला लुटलं, त्यांना पै अन् पैचा हिशेब द्यावा लागणार- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:37 PM2019-03-31T18:37:05+5:302019-03-31T18:52:18+5:30
मै भी चौकीदार या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं आहे.
नवी दिल्ली- मै भी चौकीदार या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांना ग्वाल्हेरच्या एका महिला शिक्षिकेनं भ्रष्टाचारसंदर्भात प्रश्न विचारला, त्यावर मोदींनी सडेतोड उत्तर दिलं. मोदी म्हणाले, ज्यांनी देशाला लुटलं. त्यांना पै अन् पैचा हिशेब द्यावा लागणार आहे. 2014नंतर भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाच्या दरवाज्यापर्यंत आणलं आहे, आता फक्त त्यांना तुरुंगात टाकण्याचा निर्णय घ्यायचा आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. शिक्षक हा मोठा चौकीदार असतो. तो येणाऱ्या पिढीची सुरक्षा करतो. 2019मध्ये जेव्हा मी शपथ घेईन, तेव्हा 130 कोटी हिंदुस्तानी नागरिकांनी शपथ घेतली, असं समजावे.
भारतीय जवानांवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशातील जवान आपल्या देशाची मान कधीच खाली पडू देणार नाहीत. जवानांच्या सामर्थ्यावर विश्वास असल्यानेच मी पूर्णपणे जवानांना स्वातंत्र दिले. सगळ्यांनाच माहित आहे दहशतवाद्यांचा मूळ कुठे आहे? दहशतवादी मुंबईत आले अनेकांना मारलं, उरीमध्ये आले जवानांवर हल्ला केला. हे कधीपर्यंत चालणार म्हणून मी निश्चित केलं, दहशतवाद्यांचं रिमोट कंट्रोल कुठून चालतं तिथेच हल्ला करायचा. माझ्यासाठी निवडणूक महत्त्वाची नव्हती तर देशाच्या सुरक्षेला मी प्राधान्य दिलं. पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालवली जातात. मात्र जगापासून लपविण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलतं म्हणून आम्ही अशा ठिकाणी वार केला त्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली असं पंतप्रधानांनी सांगितलं. मात्र आपल्याच देशातील काही लोक मोदींना शिव्या देण्यात धन्यता मानतात हे दुर्देव आहे अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.
मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही
2014 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने मला दायित्व देऊन पंतप्रधानपदावर बसवलं. मी तेव्हा जनतेला आश्वासन दिलं होतं की जनतेचा पैसा मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही. मी चौकीदाराच्या रुपात आपली जबाबदारी पार पडेन आज मला आनंद होतोय की आज देशातील प्रत्येक नागरिक जो या देशासाठी काम करतोय तो चौकीदार आहे, देशाच्या जनतेला राजा-महाराजांची गरज नाही, चौकीदार हवाय अस मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. चौकीदार ही एक भावना आहे. चौकीदार एक व्यवस्था आहे, चौकीदाराला ना कोणता गणवेश आहे ना कोणतंही बंधन आहे. देशाला हुकूमशहा नको आहे. देशाची जनता चौकीदाराला पसंत करते असं पंतप्रधानांनी सांगितलं.