ज्यांना पार्टीतून बाहेर जायचं आहे, त्यांनी नाटकं करु नयेत - अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 10:02 PM2017-08-07T22:02:18+5:302017-08-07T22:02:39+5:30
ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे, त्यांनी बिनधास्त जावे. परंतु त्यांनी नाटकं करु नयेत असे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले.
लखनऊ, दि. 7 - ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे, त्यांनी बिनधास्त जावे. परंतु त्यांनी नाटकं करु नयेत असे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले. लखनऊमधील समाजवादी पार्टीच्या ऑफिसमध्ये आज रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी त्यांना राखी बांधली. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “अच्छा हुआ लोग चले गए, पता तो चला अपने कौन हैं और पराए कौन.”
गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उत्तरप्रदेशच्या दौ-यावर होते. त्यावेळी समाजवादी पार्टीच्या तीन आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या एका आमदाराने भाजपामध्ये प्रवेश केला. यावर समाजवादीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना अखिलेश यादव यांनी म्हणाले की, ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे. त्यांनी बिनधास्त जावे, पण नाटकं करु नयेत.
यावेळी भाजपामध्ये गेलेले बुक्कल नवाब यांच्यावरही अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, ईदच्या सणानिमित्त बुक्कल नवाब यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळी ते खूप आनंदी होते. परंतू आता भाजपामध्ये गेल्यानंतर सांगतात की, समाजवादी पार्टीमध्ये खूप घुसमट होत होती. माझ्या माहितीप्रमाणे एक जमीन प्रकरण आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी सध्या ते भाजपाचा सहारा घेत आहेत. तसेच, बुक्कल नवाब यांच्यासह समाजवादी पार्टीतून बाहेर पडलेल्या सरोजिनी अग्रवाल यांच्यावर सुद्धा अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, येत्या 9 ऑगस्टला समाजवादी पार्टीकडून रॅली काढण्यात येणार आहे. ‘ देश बचाओ, देश बनाओ’ असे या रॅलीचे नाव असून रॅलीचे आयोजन खुद्द अखिलेश यादव करणार आहेत. तर, दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टीचे आणखी तीन आमदार भाजपात जाण्याच्या वाटेवर आहेत.