मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:35 AM2024-05-23T11:35:40+5:302024-05-23T11:38:34+5:30

उत्तराखंडच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. मोदी यांना पंतप्रधान बनविण्यात उत्तराखंडच्या जनतेने नेहमीच हातभार लावला आहे. तसेच योगदान उत्तराखंड या लोकसभा निवडणुकांतही देणार आहे.  - पुष्करसिंह धामी मुख्यमंत्री, उत्तराखंड

Those who want Modi to become the Prime Minister again, vote enthusiastically says Pushkar Singh Dhami | मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी

एनडीएला निवडणुकीत ४००हून अधिक जागा मिळणार हे निश्चित आहे. जे लोक विरोधी विचारधारेचे आहेत, ते मतदानाला कमी प्रमाणात येत आहेत, मात्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा आहे, ते उत्साहाने मतदान करत आहेत, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी 'लोकमत व्हिडीओज’चे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यूसीसी लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असेही ते म्हणाले. 

-     प्रश्न : राज्यघटना वाचविण्याबद्दल  चर्चा सुरू आहे. अल्पसंख्याक, दलितांमध्येही भीतीची भावना आहे. त्याचा भाजपवर काय परिणाम?
    मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी : या केवळ कपोलकल्पित कथा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, एनडीएतील घटक पक्ष राज्यघटनेचा नितांत आदर करतात. त्यामुळे कोणीही राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, ज्या विरोधकांना काहीही करून निवडणुका जिंकायच्या आहेत, ते खोट्या कहाण्या पसरविण्याचे व लोकांची फसवणूक करण्याचे काम करत आहेत. 

-     प्रश्न : आपण पहिले मुख्यमंत्री व उत्तराखंड पहिले राज्य आहे, जिथे समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्यात आला. आपल्या विचारांशी उत्तराखंडमधील जनता सहमत आहे, असे आपल्याला वाटते का?
    आम्ही यूसीसीचे विधेयक संमत केले व कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले. आम्ही संमत केलेल्या यूसीसीच्या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मान्यता दिली. उत्तराखंडमधील जनताही आमच्याच विचारांची असून, ती आम्हालाच मतदान करणार आहे.

-     प्रश्न : आघाडीच्या राजकारणाला महाराष्ट्रात किती यश मिळाले आहे, असे आपल्याला वाटते?
    महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या राजकारणाला चांगले यश लाभले आहे. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे हे जनतेने ठरविले आहे. त्यामुळे देशातही एनडीए आघाडीला उत्तम यश मिळणारच आहे. 

-     प्रश्न : उत्तराखंड व महाराष्ट्रामध्ये नेमके काय नाते आहे, असे तुम्हाला वाटते?
    महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी आहे, तर उत्तराखंड ही देशाची पर्यावरणविषयक राजधानी आहे. दोन्ही ठिकाणी काही विशेष गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये विशाल समुद्र आहे, उत्तराखंडमध्ये पर्वतराजी आहे, हिमालय आहे, विशाल जंगल आहे, नद्या आहेत. पर्यावरणदृष्ट्यादेखील विचार केला, तर दोन्ही राज्यांमध्ये काही खास नाते आहे. 

-     प्रश्न : महाराष्ट्राप्रमाणे उत्तराखंडमध्येदेखील स्थलांतर होत आहे. ते रोखण्यासाठी आपण काही वेगळी योजना आखली आहे का?
    लोकांनी स्थलांतर करून उत्तराखंडमध्ये येणे कमी व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. तसेच, उत्तराखंडमधील लोकांनीही अन्य राज्यात न जाता, त्यांना घराच्या जवळील प्रदेशातच उत्तम रोजगार, सुविधा मिळाव्या, यासाठी आम्ही काम करत आहोत. कोरोना साथीनंतर या कामाला सुरुवात झाली. आता उत्तराखंडमध्ये लोकांनी आपल्या घराजवळच छोटे-छोटे उद्योग सुरू केले आहेत. त्यातून त्यांना रोजगार मिळत आहे. जे लोक अन्य राज्यांत रोजगारासाठी गेले होते, ते आता उत्तराखंडमध्ये परत येत आहेत. त्यांच्यासाठी राज्य सरकारने  मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, मुख्यमंत्री नॅनो योजना, वीरचंद्रसिंह गढवाली योजना लागू केल्या आहेत. आणखी काही योजनांवर सध्या काम सुरू आहे.

-     प्रश्न : पर्यावरणाचे नुकसान टाळून राज्याचा विकास करण्यासंदर्भात आपण काय प्रयत्न करत आहात?
    सिलक्यारा टनेलची तेथील परिसराला नितांत आवश्यकता आहे. हा टनेल बनल्यानंतर प्रवासाचे अंतर कमी होणार असून, पावसाळा, हिमवृष्टीच्या वेळीदेखील तेथून वाहतूक सुरू राहिल. मात्र, सिलक्यारा टनेलसारख्या घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, सर्व कामगार सुरक्षित राहावेत, लोकांना कोणताही त्रास होऊ नये, याची यापुढे दक्षता घेतली जाईल. उत्तराखंड सरकार पर्यावरण व अर्थव्यवस्था यांचे योग्य संतुलन साधून आपले काम करत आहे. त्यासाठी काही विशिष्ट पद्धतीचा अवलंब करणार आहोत. या कामांचे सेफ्टी ऑडिट केंद्र सरकार करत आहे.

-     प्रश्न : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा यांसहित अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत तुम्ही स्वत: प्रचाराला जात आहात. त्या राज्यांतील वातावरण तुम्हाला कसे वाटतेय?
    नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे, अशीच लोकांची इच्छा आहे. पश्चिम, दक्षिण भारत व अन्य राज्यांतही हीच भावना दिसून येते आहे. अनेक राज्यांत मी निवडणूक प्रचारासाठी जातो. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड या सर्वच ठिकाणी मोदींना प्रचंड पाठिंबा आहे. सभांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. सध्या काही ठिकाणी ४५, ४० डिग्री सेल्सिअस तापमान आहे, मात्र लोक त्याची चिंता न करता मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत. 

-     प्रश्न : यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचे कोणते मुद्दे वाटतात? लोक काय विचार करत असावेत?
    भारताला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जे महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यामुळे देशात उत्तम कारभार सुरू आहे. संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा, मान आणखी वाढला आहे. भ्रष्टाचार संपला असून, घराणेशाहीच्या राजकारणाला चाप बसला आहे. लांगुलचालनाचे जे प्रयत्न चालायचे, त्याचे पितळ आता उघडे पडले आहे. जनता हे सारे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दहा वर्षे जो उत्तम कारभार केला, त्यामुळे या देशात एक नवी कार्यसंस्कृती निर्माण झाली. सगळ्यांना सोबत घेऊन, तसेच पारदर्शक पद्धतीने, प्रामाणिकपणे काम करायचे या गोष्टींना आता प्राधान्य देण्यात आले आहे.

-     प्रश्न : चारधाम यात्रेसाठी काही वेगळी योजना लागू करणार आहात का?
    यंदाच्या वर्षी यात्रेकरू नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने चारधाम यात्रेसाठी आले आहेत. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, असे आमच्या सरकारचे प्रयत्न आहेत. ही यात्रा नीट पार पडावी म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. चारधाम यात्रेतील स्थितीवर मी स्वत: लक्ष ठेवून आहे. 


 

Web Title: Those who want Modi to become the Prime Minister again, vote enthusiastically says Pushkar Singh Dhami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.