सार्वजनिक ठिकाणी ‘स्मोकिंग’ केल्यास एक हजार रुपये दंड
By admin | Published: January 14, 2015 05:21 AM2015-01-14T05:21:38+5:302015-01-14T05:21:38+5:30
सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी आणण्यासह तंबाखू खरेदीसाठी सध्या असलेली किमान वयाची मर्यादा १८ वरून २१ वर्षे करण्यासाठी सरकारने धूम्रपानविरोधी कायद्यात कठोर बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे
नवी दिल्ली : सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी आणण्यासह तंबाखू खरेदीसाठी सध्या असलेली किमान वयाची मर्यादा १८ वरून २१ वर्षे करण्यासाठी सरकारने धूम्रपानविरोधी कायद्यात कठोर बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विरोध झुगारत सरकारने हे पाऊल उचलण्याचे ठरविले आहे.
सार्वजनिक स्थळी धूम्रपानाबद्दल सध्या २०० रुपये दंड असून, तो १ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील विशिष्ट ‘स्मोकिंग झोन’ (धूम्रपानाला मुभा असलेली जागा) हटविण्याचा निर्णयही सरकारने
घेतला. सिगारेट आणि अन्य तंबाखूयुक्त उत्पादनांचा व्यापार, व्यावसायिक उत्पादन, पुरवठा, वितरण आणि जाहिरातीला प्रतिबंध घालण्यासंबंधी सुधारित विधेयक २०१५ संसदेत आणले जाणार असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याबाबत सार्वजनिकरीत्या सूचना मागितल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)