पटेलांनी घेतली एक हजार तिकिटे
By Admin | Published: October 14, 2015 11:45 PM2015-10-14T23:45:08+5:302015-10-14T23:45:08+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या पाटीदार पटेल समाजाच्या सदस्यांनी राजकोट येथे येत्या रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या
राजकोट : आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या पाटीदार पटेल समाजाच्या सदस्यांनी राजकोट येथे येत्या रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याची सुमारे १००० तिकिटे विकत घेतल्याची माहिती आहे.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एससीए) स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या स्टेडियमवरून मंगळवारी २००० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली. तिकीट मिळविण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी सोमवारच्या रात्रीपासूनच स्टेडियमसमोर रांगा लावलेल्या होत्या. यावेळी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीहल्लाही करावा लागला.
पटेल आरक्षण आंदोलन लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने या सामन्याच्या वेळी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट सामन्याच्या वेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून तिकीट विकत घेणाऱ्यांसाठी ओळखपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, पाटीदार समाज १८ आॅक्टोबर रोजी आपले डावपेच आखणार असल्याचे समजते.
या सामन्याचे तिकीट विकत घेणाऱ्या सर्व पाटीदारांना पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांकडे आपला मोबाईल नंबर, तिकीट आणि आसन क्रमांक नोंदविण्याचे सांगण्यात आले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यानचा तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १८ आॅक्टोबर रोजी राजकोट येथे खेळला जाणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता २९००० आहे. (वृत्तसंस्था)