अफगाणमधून दररोज हजार टन कांदा आयात
By admin | Published: August 28, 2015 11:49 PM2015-08-28T23:49:42+5:302015-08-28T23:49:42+5:30
कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तसह इतर देशांतून त्याची आयात करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता अफगाणिस्तानमधून दररोज एक हजार टन माल भारतात येत आहे.
चंदीगड : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तसह इतर देशांतून त्याची आयात करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता अफगाणिस्तानमधून दररोज एक हजार टन माल भारतात येत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील ग्राहकांना दरात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अट्टारी - वाघा महामार्गाद्वारे हा कांदा ट्रकमधून पंजाबमध्ये आयात केला जात आहे. अजून पुढील १५-२० दिवस कांद्याची आयात सुरू राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दररोज किमान २० ते २५ ट्रकद्वारे अफगानिस्तातून एक हजार टन कांद्याची आयात केली जात आहे, असे कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री या संघटनेचे माजी अध्यक्ष (अमृतसर विभाग) राजदीप उप्पल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी केवळ ६-७ ट्रक माल अफगाणिस्तानमधून येत होता. आता त्यात वाढ झाल्याचे उप्पल म्हणाले.
आयात केलेला माल पंजाब, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणात पाठविला जात आहे. त्यामुळे तेथील भाव काही प्रमाणात नियंत्रित राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अफगाणिस्तामधून आयात केलेल्या कांद्याचा घाऊक दर १५ ते ३० रुपये किलो आहे. पंजाबमध्ये किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर किलोमागे ६० रुपयांच्या वर असल्याने अफगाणिस्तानातून आयात केलेल्या मालामुळे दरवाढीला चाप लागू शकतो, असे व्यापाऱ्यांना वाटते. पाकिस्तानमध्येही अपेक्षित पीक न आल्याने तेथून कांद्याची निर्यात करण्यास व्यापारी इच्छुक नाहीत. कांद्याच्या टंचाईमुळे पंजाबमधील व्यापाऱ्यांनी जानेवारी २०११ मध्ये पाकिस्तानमधून तर सप्टेंबर २०१३ मध्ये अफगाणिस्तानातून माल आयात केला होता.
अफगाणिस्तानचा कांदा स्वस्त असला तरी त्याचा दर्जा भारतीय कांद्याच्या तुलनेत चांगला नाही.