राजस्थानात सांभर सरोवरात हजारो पक्ष्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:09 AM2019-11-13T04:09:58+5:302019-11-13T04:10:04+5:30
जयपूरनजीकच्या खारट पाण्याच्या सर्वात मोठ्या सांभर सरोवरोभोवती हजारो देश-विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि प्रशासन हादरले आहे.
सांभर : जयपूरनजीकच्या खारट पाण्याच्या सर्वात मोठ्या सांभर सरोवरोभोवती हजारो देश-विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि प्रशासन हादरले आहे. सरोवरातील पाणी दूषित असल्याने पक्षी दगावल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे. तथापि, आम्ही शरीराच्या आतील अवयव मुख्यत्वे आतड्यातील द्रवपदार्थ (व्हिसेरा) चाचणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मृत पक्ष्यांचा अधिकृत पाच हजारांहून अधिक असल्याचे पक्षीनिरीक्षक अभिनव वैष्णव यांनी सांगितले. पक्षी निरीक्षक असलेला माझा मित्र किशन मीणा आणि पवन मोदी यांना हे गोळे नव्हे तर मृतावस्थेत पडलेले देश-विदेशातील पक्षी असल्याचे लक्षात आले. १२ ते १३ किलोमीटर काठावर विदेशी पक्षी मृतावस्थेत विखरून पडलेली होती.
>बर्ड फ्लूची शक्यता नाकारली
वन संरक्षक राजेंद्र जाखड यांनी सांगितले की, गारपिटीच्या तडाख्याने एवढ्या मोठ्या संख्येने पक्ष्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी या भागात गारपीट झाली होती. दहा प्रजातींचे जवळपास १,५०० पक्षी दगावल्याचा आमचा अंदाज आहे. दूषित पाणी, जिवाणू वा विषाणू संसर्गाची शक्यताही आम्ही तपासून पाहत आहोत, असे त्यांनी सांगितले.