काश्मीरला हजार कोटी
By admin | Published: September 8, 2014 03:26 AM2014-09-08T03:26:10+5:302014-09-08T03:26:10+5:30
मुसळधार पाऊस आणि विक्राळ पुरामुळे जम्मू-काश्मिरातील पूरस्थिती कमालीची गंभीर झाली आहे. या स्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले
श्रीनगर/ जम्मू : मुसळधार पाऊस आणि विक्राळ पुरामुळे जम्मू-काश्मिरातील पूरस्थिती कमालीची गंभीर झाली आहे. या स्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले. तसेच एक हजार कोटी रुपयांच्या विशेष मदतीची घोषणा केली. राज्यातील पुराने आणखी रौद्ररूप धारण केले असून, बळींची संख्या १५० वर पोहोचली आहे़ जम्मू-काश्मीर या अपूर्व संकटाला सामोरे जात असतानाच तशीच परिस्थिती ओढवलेल्या पाकव्याप्त काश्मीरलाही भारताने मदतीचा हात देऊकेला आहे.
श्रीनगरमधील स्थिती इतकी भीषण आहे की लष्करी छावणी, नागरी सचिवालय, उच्च न्यायालय हा सारा परिसर जलमय झाला आहे़ जम्मूतही स्थिती गंभीर आहे़ रविवारी पंतप्रधानांनी या पूरस्थितीची हवाई पाहणी केली़ यानंतर श्रीनगरला पोहोचताच त्यांनी राष्ट्रीय आपत्ती आणि मदतीची घोषणा केली. पंतप्रधानांनी अन्य राज्यांनाही जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले़ आपले सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले़ पाकव्याप्त काश्मिरातील पूरपीडितांच्या मदतीसाठीही भारत तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले़ जम्मू-काश्मीरप्रमाणेच पाकव्याप्त काश्मिरातही पुराने भीषण हानी झाली आहे़ पाकिस्तानची तयारी असेल तर भारत पाकव्याप्त काश्मिरात मानवीय दृष्टीने मदत देण्यास तयार आहे, असे मोदी म्हणाले़