Karnataka Chariot Festival : कोरोनाची भीती नाही! रथोत्सवात हजारोंची गर्दी, भाविकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:11 PM2022-01-18T16:11:04+5:302022-01-18T16:12:27+5:30
Karnataka Chariot Festival : चिकमंगळूर जिल्ह्यात श्री शकुन रंगनाथ स्वामी मंदिरात रथोत्सवात शेकडो लोकांनी सोशल डिस्टंसिंग नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. स्थानिक प्रशासनाने मिरवणूक न काढण्याचे आदेश दिल्यानंतरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बंगळुरू: देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron) प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाही, लोक कोरोना नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. असे असतानाही ठिकाणी हजारो लोकांनी गर्दी (Mass Gathering) करत एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला. विशेष म्हणजे त्यापैकी बहुतेकांनी मास्कही घातलेले नव्हते.
चिकमंगळूर जिल्ह्यात श्री शकुन रंगनाथ स्वामी मंदिरात रथोत्सवात शेकडो लोकांनी सोशल डिस्टंसिंग नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. स्थानिक प्रशासनाने मिरवणूक न काढण्याचे आदेश दिल्यानंतरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक पोलिसांनी सर्व कार्यक्रम आणि राजकीय रॅलींवर बंदी घालण्याचा आदेश जारी केल्यानंतर काही तासांनी हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. चिकमंगळूरच्या उपायुक्तांनी स्थानिक तहसीलदारांना जारी केलेल्या आदेशात मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली होती आणि उत्सव मंदिराच्या आवारात आयोजित केला जाऊ शकतो, परंतु 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकत नाहीत, असे म्हटले होते.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रथ गर्दीच्या परिसरातून जात असल्याचे दिसत आहे. रथाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने लोक आहेत, जे रथ पोहोचल्यानंतर प्रार्थना करताना दिसतात. लोकांचा एक समूह खांद्याला खांदा लावून उभा असतो कारण ते दोरीने रथ ओढतात. या गर्दीत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे दिसून येत आहे. पुजारी आणि इतर तीन लोकही रथात एका छोट्या जागेवर बसलेले आहेत, तेही मास्कशिवाय दिसत आहेत.
कर्नाटकात संसर्गाचे प्रमाण 12.45 टक्के
सोमवारी कर्नाटकमध्ये 27 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात संसर्गाचे प्रमाण 12.45 टक्के आहे. राज्यात 24 तासांत संसर्गामुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या 2,17,297 आहे. तर देशात कालच्या तुलनेत आज काही प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 310 जणांचा मृत्यू झाला आहे.