हजारो परप्रांतीयांचे काश्मीर खोऱ्यातून पलायन; दहशतवाद्यांनी हत्यांचे सत्र अवलंबल्याने घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 07:23 AM2021-10-20T07:23:32+5:302021-10-20T07:24:38+5:30
काश्मिरातील साडेतीन लाख परप्रांतीय मजुरांपैकी बुहतेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे.
- सुरेश डुग्गर
जम्मू : दहशतवाद्यांनी हत्यांचे सत्र अवलंबल्याने काश्मिरातील परप्रांतीय मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण असून अनेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. काही मजुरांनी सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात ११ जणांची हत्या झाली. त्यात पाच परप्रांतीय मजुरांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर काश्मिरातील साडेतीन लाख परप्रांतीय मजुरांपैकी बुहतेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी काही जण तर गेल्या १० ते १५ वर्षांपासून काश्मिरात रहात आहेत. ३७० कलम रद्द आणि काश्मीरचे त्रिभाजन या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी अनेकांनी खोरे सोडले होते. पळून गेलेले हे मजूर गेल्या वर्षीच्या सुरुवातीला परतले होते. कोरोनामुळे त्यांना पुन्हा मूळगावी परतावे लागले. परंतु कामानिमित्त अनेक जण पुन्हा खोऱ्यात आले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून खोऱ्यात दहशतादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जिवाच्या आकांताने हे मजूर पलायन करताना दिसत आहे.
पर्यटन, शिक्षणाला फटका
अतिरेक्यांनी अलीकडेच दोन शिक्षकांची हत्त्या केली. त्यामुळे शाळा ओस पडल्या आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे पर्यटकही खोऱ्याकडे फिरकत नसल्याने या दोन्ही क्षेत्रांना फटका बसला आहे.