संघासाठी तयार होत आहेत हजारो फुल पॅँट
By admin | Published: June 19, 2016 04:50 AM2016-06-19T04:50:35+5:302016-06-19T04:50:35+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा गणवेश विजयादशमीपासून बदलणार असून, त्यासाठी राजस्थानातील एका खेड्यात तपकिरी रंगाच्या हजारो फुल पॅँट शिवण्यात येत आहेत.
उदयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा गणवेश विजयादशमीपासून बदलणार असून, त्यासाठी राजस्थानातील एका खेड्यात तपकिरी रंगाच्या हजारो फुल पॅँट शिवण्यात येत आहेत.
चित्तोडगड जिल्ह्यातील अकोला या खेडेगावात जयप्र्रकाश कच्छवा आणि त्यांची टीम विजारी वेळेत तयार व्हाव्यात, यासाठी अहोरात्र काम करीत आहे. विजयादशमीपूर्वी त्यांना हजारो विजारी शिवून तयार करायच्या आहेत. जयप्रकाश आणि त्यांचे वडील संघाचे कट्टर स्वयंसेवक असून, शिवणकाम हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे.
आम्ही गेल्या २२ वर्षांपासून संघाचे गणवेश शिवत आहोत. आमच्या वर्कशॉपमधून संघाच्या विविध शाखांना खाकी हाफ पँटचे दरवर्षी २० हजार संच पुरविले जातात. या कुटुंबासाठी संघाचे गणवेश तयार करणे हा व्यवसायाहून अधिक सेवेचा विषय आहे.
आम्हाला शाळा गणवेशाच्या आॅर्डर्स मिळतात. त्यातून आमच्या कारागिरांना दररोज मुबलक कमाई होते. त्यामुळे संघाचे काम करण्यामागे पैसा कमावणे हा उद्देश नाही, तर ते आमचे अहोभाग्य आहे, असा दावा जयप्र्रकाश यांनी केला.
जयप्र्रकाश यांच्याकडील कुशल टीमने आठवडाभरापूर्वी विजारी शिवण्याचे काम सुरू केले आहे. माझ्याकडे आठ कुशल टेलर असून, ते अनेक वर्षांपासून आमच्याकडे काम करतात. याशिवाय गावातील २० गरजू महिलांनाही आम्ही शिवणकामाचे प्रशिक्षण दिले असून, त्यादेखील काम करीत आहेत, असेही ते म्हणाले. त्या गावातील किमान ४० शिंप्यांकडे फुल पॅँट शिवण्याचे काम सुरू असून, ते सारेजण सध्या आनंदात आहेत.
संघाची सर्वोच्च धोरण समिती अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या राजस्थानातील नागौर येथे झालेल्या वार्षिक सभेत संघ गणवेशातून खाकी हाफ पँट वगळण्याचा निर्णय झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)