पाच राज्यांतील हजारो जाट राजधानीत दाखल
By admin | Published: March 3, 2017 04:37 AM2017-03-03T04:37:57+5:302017-03-03T04:37:57+5:30
हरियानात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड या पाच राज्यांतील हजारो जाट लोक येथील जंतरमंतरवर आले
नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांत जाट समाजाला राखीव जागा द्याव्यात या मागणीसाठी हरियानात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड या पाच राज्यांतील हजारो जाट लोक येथील जंतरमंतरवर आले असून, तिथे त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
नवी दिल्लीतील जंतरमंतर भागाकडे जाणारे सर्व रस्ते उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना व पंजाबमधून आलेल्या आंदोलकांमुळे बंद पडले व वाहनचालकांची व प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. आंदोलकांना जंतरमंतरपर्यंत जाता यावे यासाठी वाहतूक आणि पोलीस कर्मचारी ठराविक ठिकाणी व्यवस्था बघत होते.
हरियानात सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जंतरमंतरवर ‘जाट न्याय धरणे’ आंदोलन करण्यात आले, असे अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष यशपाल मलिक यांनी सांगितले. हे आंदोलन या समितीमार्फत चालवले जात आहे. जाटांचे शिष्टमंडळ राखीव जागांच्या मागणीबाबतचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधानांना सादर करील व संसदेवर मोर्चा काढण्यात येईल, असे मलिक म्हणाले.
जाटांची आम्हाला इतर मागासवर्ग (ओबीसी) गटातून सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांत राखीव जागा मिळाव्यात अशी मागणी आहे. या मागणीसह गेल्या वर्षी याच मागणीसाठी हरियानात झालेल्या आंदोलनातून तुरुंगात असलेल्यांची सुटका करावी, आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आणि आंदोलनात ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना तसेच जखमी झालेल्यांना सरकारी नोकरी द्यावी, अशीही मागणी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>५0 लाखांचा मोर्चा?
गेल्या वर्षी हरियानात झालेले हे आंदोलन हिंसक बनले होते व त्यात ३० जण ठार व कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली होती.
त्या आंदोलनाच्या काळात काही महिलांवर बलात्कार व अत्याचार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी सध्या सुरू आहे.
मागण्या मान्य न झाल्यास ५0 लाख जाट दिल्लीत आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.