हजारो काश्मिरी तरुण पोलीस भरतीस तयार
By admin | Published: September 22, 2016 05:59 AM2016-09-22T05:59:22+5:302016-09-22T05:59:22+5:30
हुरीयत कॉन्फरन्सचे जहाल नेते सईद अली शाह गिलानी यांनी काश्मिरींना पोलीस सेवेत सामील होऊ नका
श्रीनगर : हुरीयत कॉन्फरन्सचे जहाल नेते सईद अली शाह गिलानी यांनी काश्मिरींना पोलीस सेवेत सामील होऊ नका, असे आवाहन करूनही खोऱ्यामध्ये हजारो तरुणांनी विशेष पोलीस अधिकारी पदासाठी फिटनेस चाचणी दिली. केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीर पोलीस दलात १० हजार तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती.
गिलानकी यांचा आदेश धुडकावून, पाच हजारांपेक्षा जास्त तरुणांनी पोलीस दलातील जागेसाठी अर्ज करून फिटनेस चाचणी दिली. काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ््या जिल्ह्यांतील पोलीस उपायुक्तांमार्फत या जागा भरल्या जाणार आहेत. एसपीओंना सहा हजार रुपये वेतन दिले जाईल. यावर्षी जानेवारीपासून हे वेतन तीन हजार रुपयांनी वाढविण्यात आले. पोलिसांच्या विशेष कारवाई गटात काम केलेल्या व शरण आलेल्या अतिरेक्यांना प्रारंभी हे पद दिले गेले परंतु एसओजी बरखास्त करण्यात येऊन सुमारे २४ हजार एसपीओंना पोलिसांत विलीन करण्यात आले. (वृत्तसंस्था)
तीन भागांत संचारबंदी
श्रीनगरच्या केवळ तीन भागांत बुधवारी संचारबंदी लागू करण्यात आली होती. इतर भागातील परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे तेथील संचारबंदी काढून घेण्यात आली. संपूर्ण खोऱ्यात जमावबंदी कलम लागू आहे.
बंधने आणि फुटीरवाद्यांनी केलेला संप यामुळे सलग ७५ व्या दिवशीही खोऱ्यातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झालेला आहे. श्रीनगर आणि खोऱ्यात इतरत्र दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि पेट्रोलपंप आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद आहे.
शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था अजून सुरू झालेल्या नाहीत.संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद असून प्रीपेड कार्डवरील आऊटगोर्इंग कॉल्सना मनाई आहे. ८ जुलैपासून खोऱ्यातील हिंसाचारात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह ८१ जण ठार झाले व हजारो जखमी झाले आहेत.