हजारो किलो विस्फोटक; 28 ऑगस्टला जमीनदोस्त होणार नोएडातील बेकायदेशीर ट्विन टॉवर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 04:54 PM2022-08-14T16:54:34+5:302022-08-14T16:54:47+5:30
बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले सुपरटेकचे ट्विन टॉवर 28 ऑगस्ट रोजी पाडण्यात येणार आहे.
नोएडा: अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश देण्यात आले. कोर्टाच्या आदेशानुसार, येत्या 28 ऑगस्ट रोजी सुपरटेकचे नोएडातील बेकायदेशीरपणे बांधलेले ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. रविवारपर्यंत(आज) सुमारे 600 किलो विस्फोटक लावण्यात आली असून, येत्या काही दिवसात दोन्ही टॉवर्समध्ये प्रत्येक मजल्यावर केलेल्या शेकडो छिद्रांमध्ये एकूण 3 हजार सातशे किलोग्रॅम स्फोटके भरली जाणार आहेत.
एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. कंपनीचे अधिकारी उत्कर्ष मेहता यांच्या म्हणण्यानुसार, हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. या टीममध्ये सहा परदेशी तज्ज्ञांचाही समावेश असून, टीमला अशाप्रकारे इमारत पाडण्याचा अनुभव आहे. या टीममध्ये दहा भारतीय अभियांत्रिकी तज्ञ आणि तीस मजूर काम करत आहेत. ही टीम दररोज सूमारे 12 तास स्फोटके लावण्याचे काम करत आहेत.
परिसरात मोठा ढिगारा होणार
मिळालेल्या माहितीनुसार, इतक्या स्फोटकांच्या मदतीने अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे टॉवर जमीनदोस्त होतील. विशेष म्हणजे, 103 मीटर उंच म्हणजेच 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. त्या ढिगाऱ्याला उचलायला नंतरचे काही आठवडे लागतील. या इमारती पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत याची धूळ पसरेल. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीने झाकले गेले आहे.