महिनाअखेरपर्यंत हजार टन कांदा आयात होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 01:59 AM2019-11-20T01:59:27+5:302019-11-20T06:17:12+5:30
देशभर कांद्याची प्रचंड टंचाई असून, त्याचे भाव प्रतिकिलो ८0 रुपयांवर गेले आहेत
नवी दिल्ली : देशभर कांद्याची प्रचंड टंचाई असून, त्याचे भाव प्रतिकिलो ८0 रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी विदेशातून कांदा आयात करण्यासाठी ऑडर्स दिल्या असून, चालू महिन्याच्या अखेरपर्यंत किमान १ हजार टन कांद्याची आयात होऊ शकेल, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत कांदा १०० रुपये किलो झाला होता. सरकारने विविध पातळ्यांवर हस्तक्षेप केल्यामुळे किमती काही प्रमाणात कमी झाल्या. तरीही सध्या कांद्याचे दर ६० ते ८0 रुपये किलोच्या दरम्यान असून, विदेशी कांदा आल्यानंतरच ते खाली येऊ शकतील, असे सूत्रांनी सांगितले.
वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, खासगी व्यापाऱ्यांनी अल्प प्रमाणात कांदा आयात केल्याचे सरकारला कळविले आहे. याशिवाय महिनाअखेरपर्यंत १ हजार टन कांद्याची आयात होणार आहे. पुढील महिन्यात आणखी १ हजार टन कांदा आयात होईल.
अधिकाºयाने सांगितले की, डिसेंबरअखेरपर्यंत आयातीसाठी आवश्यक असलेले निकष शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कांदा आयात सुलभेतेने होईल. देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता व्हावी आणि किमती नियंत्रणात राहाव्यात, यासाठी सरकारने खासगी व्यापारी आणि सरकारी संस्था यांच्या माध्यमातून कांदा आयातीस परवानगी दिली आहे. सरकारी मालकीच्या एमएमटीसीमार्फत १ लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एमएमटीसीने ४ हजार टन कांदा आयातीसाठी निविदाही मागविल्या आहेत.
सरकारच्या उपाययोजना
सूत्रांनी सांगितले की, यंदा खरीप हंगामात पूर आणि दुष्काळ यामुळे कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याची आयात करणे क्रमप्राप्तच ठरले आहे. कांद्याची उपलब्धता वाढावी, तसेच किमती नियंत्रणात राहाव्यात, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांत आयातीचे निकष शिथिल करणे, निर्यात बंदी, व्यापाºयांच्या साठ्यांवर मर्यादा आणि शिलकी साठ्यातील कांद्याची सवलतीच्या दरात विक्री यांचा समावेश आहे.