सर्वोच्च न्यायालयावर बॉम्बहल्ल्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 10:24 PM2015-08-18T22:24:42+5:302015-08-18T22:24:42+5:30
सर्वोच्च न्यायालय बॉम्बस्फोटात उडविण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय बॉम्बस्फोटात उडविण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा बंदोबस्त आणखी वाढविण्यात आला असून इंटर्न वकिलांसह सर्व अनोळखी व्यक्तींच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय वकिलांनाही परिसरातील संशयास्पद हालचालींबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांना सोमवारी हा धमकी देणारा ई-मेल मिळाला होता. त्यानंतर सतर्कतेचे निर्देश देण्यात आले. अलीकडेच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फासावर चढविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, तेव्हापासून सर्वोच्च न्यायालय परिसर आणि आजूबाजूच्या भागात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.
सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या सचिव ऐश्वर्य भाटी यांनी एका पत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाला असलेला धोका लक्षात घेऊन अतिसुरक्षित क्षेत्रात सल्लामसलतीसाठी येणारे लोक, तसेच कायद्याच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश बंदीचा सरन्यायाधीशांचा प्रस्ताव आहे. या पत्रकात संघटनेच्या सदस्यांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली असून कुठलीही संशयास्पद हालचाल अथवा सामान आढळल्यास त्याची सूचना त्वरित न्यायालयाच्या सुरक्षेत असलेल्या पोलीस उपायुक्त कार्यालयास देण्याची विनंती करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)