चिनी अॅपपासून देशाला धोका, UC Browser, UC News, Truecaller तात्काळ हटवण्याचा सैनिकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 11:41 AM2017-11-29T11:41:22+5:302017-11-29T12:09:16+5:30
सीमेपलीकडून हेरगिरी होत असल्याच्या संशय असून, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चीनी मोबाईल अॅप देशासाठी धोका असल्याचा इशारा दिला आहे. या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून चीन भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून डाटा चोरत आहेत.
नवी दिल्ली - सीमेपलीकडून हेरगिरी होत असल्याच्या संशय असून, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चिनी मोबाईल अॅप देशासाठी धोका असल्याचा इशारा दिला आहे. या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून चीन भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून डाटा चोरत आहे. चिनी सीमेवर तैनात जवानांना आपल्या स्मार्टफोनमधून ट्रूकॉलर, विबो, वीचॅट, यूसी ब्राऊजर आणि यूसी न्यूजसारखे अॅप्स हटवण्यास सांगण्यात आलं आहे. मोबाइलमधील अॅप्स काढून टाका किंवा फोन फॉरमॅट करा अशी सूचनाच देण्यात आली आहे. अधिका-यांचं म्हणणं आहे की, अधिकारी आणि जवानांसाठी जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायजरीवरुन विदेशी गुप्तचर यंत्रणा त्यातही खासकरुन चीन आणि पाकिस्तान मोबाइल अॅपमधून डाटा चोरण्याचं काम करत होते.
गुप्ततर विभागाने जारी केलेल्या अॅडव्हायजरीमध्ये 42 प्रसिद्ध चिनी अॅप्सचा उल्लेख करण्यात आला आहे. ट्रूकॉलर, विबो, वीचॅट, यूसी ब्राऊजर आणि यूसी न्यूजसारखे अॅप यामध्ये असून हे अॅप्स चीनला खासगी डाटा पुरवत असल्याचा संशय आहे. असं झाल्यास सुरक्षेला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
फक्त लष्करच नाही तर इंडो - तिबेटियन बॉर्डरसारख्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाला लदाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत 4,057 किमी लांब सीमारेषेवर तैनात आहे. सशस्त्र दलदेखील अशाप्रकारे आदेश जारी करतं. आदेशात कर्मचा-यांना हेरगिरी होऊ नये तसंच सायबर सुरक्षेला धोका पोहोचू नये यासाठी स्मार्टफोन आणि कॉम्प्यूटर वापरताना धोकादायक सॉफ्टवेअर अॅप्सपासून सावधान राहण्याचा इशारा दिला जातो. अधिका-यांनी सांगितलं आहे की, कर्मचारी आपल्या फोनची सोबतच संगणकाच्या सुरक्षेची काळजी घेतील अशी अपेक्षा केली जाते. हा आदेश खासकरुन त्यांच्यासाठी आहे, जे चीनला लागून असलेल्या सीमारेषेवर तैनात आहेत.
काही दिवसांपुर्वी गुगल प्ले स्टोअरने यूसी ब्राऊजर अॅप हटवलं होतं. यानंतर पुन्हा हे अॅप उपलब्ध करुन देण्यात आलं होतं. यासोबतच युसी ब्राऊजरवर डाटा सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.
भारतीय ग्राहकांचा मोबाईल डाटा लीक केला जात असल्याचा संशय असल्याने जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचं UC मोबाईल ब्राऊजर सरकारच्या रडारवर आलं होतं. ब्राऊजर ग्राहकांचं लोकेशन आणि डाटा रिमोट सर्व्हरमध्ये कसा पाठवतो, याची माहिती घेण्यासाठी सरकारने कंपनीची चौकशी सुरु केली होती. UC ब्राऊजरकडून युझर आणि मोबाईलची माहिती चीनमध्ये असलेल्या रिमोट सर्व्हरला पाठवली जाते असा संशय होता. वायफायच्या माध्यमातून इंटरनेट वापरल्यास फोन आणि अक्सेस पॉईंटची माहितीही रिमोट सर्व्हरला पाठवली जाते, असं सुत्रांचं म्हणणं होतं. हैदराबादमधील एका सरकारी लॅबमध्ये याप्रकरणी तपास सुरु आहे.