लग्नात बीफ वाढलं नाही म्हणून घटस्फोटाची धमकी
By admin | Published: April 28, 2017 12:23 PM2017-04-28T12:23:10+5:302017-04-28T12:23:10+5:30
लग्नामध्ये नवरीमुलीच्या कुटुंबियांनी बीफची व्यवस्था न केल्याने नुकतंच झालेलं लग्न मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लखीमपूरखिरी, दि. 28 - लग्नामध्ये नवरीमुलीच्या कुटुंबियांनी बीफची व्यवस्था न केल्याने नुकतंच झालेलं लग्न मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सासरची माणसं आपल्याला त्रास देत असून वारंवार घटस्फोटाची धमकी देत असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
पीडित मुलगी अफसानाच्या कुटुंबियांनी लग्नामध्ये येणा-या पाहुण्यांसाठी बीफची व्यवस्था न केल्याने मुलाच्या घरचे नाराज झाले असून घटस्फोटाची धमकी देत असल्याचा आरोप आहे. प्रथेनुसार अफसानाचे वडिल सलारी तिला माहेरी घेऊन आल्यानंतर हा प्रकार समोर आला. अफसानाच्या सासरच्यांनी बीफ वाढलं नसल्याची नाराजी व्यक्त करत हुंडाही दिला नसल्याचा आरोप केला आहे.
अफसानाच्या वडिलांनी सांगितलं की, "22 एप्रिल रोजी थाटामाटात आपल्या मुलीचं लग्न केलं. लग्नात हुंडाही दिला होता. पण आता तिच्या सासरचे घटस्फोटाची धमकी देत असून आम्ही तणावाखाली आहोत.
अफसानाच्या वडिलांनी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक प्रशासनाकडे धाव घेत मदत मागितली. अफसानाने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन सर्व घटना सविस्तर सांगितली. मात्र एवढे प्रयत्न करुनही त्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे.
"योगी आदित्यनाथ आमची शेवटची आशा आहे. तेच आम्हाला मदत करु शकतात. जे चुकीचं झालं आहे त्याचा आम्ही विरोध करणार", असं अफसानाचा भाऊ बोलला आहे.