दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 11:23 AM2024-05-01T11:23:51+5:302024-05-01T11:24:19+5:30
Delhi Schools Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब स्क़ॉड, डॉग स्कॉडना पाचारण केले आहे.
दिल्ली आणि नोएडाच्या ५० हून अधिक शाळांना धमक्या देणारे ईमेल करण्यात आले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका हाय प्रोफाईल शाळेत बॉम्ब ठेवल्याचेही या मेलमध्ये म्हटले आहे. यामुळे सर्व शाळा रिकाम्या करण्यात आल्या असून तपासणी केली जात आहे. विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवून देण्यात आले आहे.
द्वारकेच्या डीपीएस, मयुर विहारचे मदर मेरी, नवी दिल्लीच्या संस्कृती स्कूलसह नोएडाच्या डीपीएस सारख्या शाळांना हे मेल करण्यात आले आहेत. लोकसभा निवड़णूक असल्याने प्रशासनातही खळबळ उडाली असून गृह मंत्रालयाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. सायबर क्राईमच्या टीमने मेलचा आयपी अॅड्रेस शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला तपास सोपविण्यात आला आहे.
शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब स्क़ॉड, डॉग स्कॉडना पाचारण केले आहे. सर्व शाळांची तपासणी केली जात असून अद्याप संशयित वस्तू सापडलेली नसल्याचे नवी दिल्लीचे डीसीपी देवेश कुमार महला यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण दिल्लीतूनही आतापर्यंत १२ शाळांनी पोलिसांना फोन करून मेल आल्याची माहिती दिली आहे. तपासात काहीही सापडले नसल्याचे समोर आले आहे.
पहिल्यांदा द्वारकेच्या डीपीएस स्कूलला हा मेल मिळाला. सकाळीच सहा वाजता पोलिसांना पाचारण करण्यात आले. अॅमिटी स्कूलला पहाटे साडे चार वाजता मेल करण्यात आला होता. परदेशातून हे मेल केले गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.