देशात Omicronचा धोका वाढला! जयपुरात एकाच कुटुंबातील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह, चंदीगडमध्ये महिलेनं क्वारंटाईन तोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 09:11 AM2021-12-04T09:11:54+5:302021-12-04T09:13:37+5:30
Omicron Variant : महाराष्ट्रात 30 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातच, राजस्थानातील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, यांपैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले होते.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धोका आता भारतातही वाढला आहे. कर्नाटकातील दोन लोकांमध्ये Omicron प्रकाराची पुष्टी झाली आहे. यानंतर राज्य सरकारने करोना विषयक नवे नियम जारी केली आहेत. महाराष्ट्रातही 30 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातच, राजस्थानातील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, यांपैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. यांचेही नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. (Omicron Variant in India)
जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील ज्या 9 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, त्यांपैकी 4 जण दक्षिण आफ्रिकेतून परतले आहेत. अद्याप त्यांच्यात ओमिक्रॉनच्या संसर्गाची पुष्टी झालेली नाही. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या सर्वच्या सर्व 9 जणांना राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात (RUHS) आइसोलेट करण्यात आले आहे.
येथील मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. नरोत्तम शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जणांचे नमुने घेण्यात आले असून, त्यांपैकी 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये 4 लोक दक्षिण आफ्रिकेतून परतल्याचे समोर आले आहे. नव्या नियमांप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्यांना आरयूएचएसमध्ये आयसोलेट रहावे लागेल. संक्रमित आढळलेल्या सर्व 9 जणांना आयसोलेट करण्यात आले आहे, तर 5 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
चंदीगडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या महिलेने क्वारंटाइन तोडले -
चंदीगड केंद्रशासित प्रदेशात दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या 39 वर्षीय महिलेने होम क्वारंटाईनचे नियम तोडले (Woman breaks quarantine in Chandigarh) आणि ती थेट बुक केलेल्या 5-स्टार हॉटेलमध्ये पोहोचली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तीन दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून चंदीगडला परतली होती. तेव्हा त्यांचा अहवालही निगेटिव्ह आला होता. पण मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार होते.
याच बरोबर, आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, 1 डिसेंबरला महिलेला होम क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले होते, मात्र 2 डिसेंबरला ती नियम मोडून 5 स्टार हॉटेलमध्ये गेली. या महिलेवर कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने चाचणी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.