"नितीश कुमारांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ", डीजीपींच्या फोनवर धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 10:11 AM2024-02-15T10:11:47+5:302024-02-15T10:27:10+5:30
डीजीपी आरएस भट्टी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.
Nitish Kumar (Marathi News) पाटणा : बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यापासून काही घडामोडी सुरु आहेत. यातच बिहारचे डीजीपी आरएस भट्टी यांना फोनवर धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा त्यांना बॉम्बने उडवून देऊ आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना ठार मारू, असे म्हटले आहे.
डीजीपी आरएस भट्टी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. यावर, बिहार पोलिसांनीही तातडीने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपासानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कर्नाटकात छापेमारी करून आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी रात्री उशिरा आरोपीसह पाटणा येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडली होती आणि त्यांच्या जुन्या आघाडी एनडीएसोबत सरकार स्थापन केले होते. यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 12 जानेवारी रोजी 243 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 ऐवजी 129 आमदारांचा पाठिंबा मिळवून एनडीए सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. मात्र, नितीश कुमार महाआघाडी सोडून भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे अनेक प्रकारचे नाराजी पाहायला मिळत आहे.
नितीश कुमारांच्या निर्णयावर जेडीयूमध्ये नाराजी!
नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याने जेडीयू आणि भाजपामधील अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. यानुसार, जेडीयूचे डॉ.संजीव, विमा भारती आणि दिलीप राय यांच्यातील नाराजी सर्वश्रुत झाला आहे. याशिवाय, इतर अनेक आमदारांनीही नितीश कुमार यांच्या एनडीएमध्ये जाण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. त्यात गोपाल मंडल, मनोज यादव असे आमदारही आहेत. तसेच रश्मी वर्मा, भागीरथी देवी आणि मिश्रीलाल यादव यांची बंडखोरी सुद्धा बिहार भाजपामध्ये दिसून आली. मात्र, त्यांची नाराजी इतर कारणांमुळे असल्याचे बोलले जात असले तरी नितीश कुमार यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर हे सर्व समोर येऊ लागले आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना सहजासहजी सरकार चालवणे सोपे नाही, हे उघड होत आहे.