राहुल गांधी यांना धमकी

By admin | Published: May 10, 2016 04:15 AM2016-05-10T04:15:58+5:302016-05-10T04:15:58+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ठार मारायची धमकी मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये तर घबराट पसरलीच आहे, पण केंद्रीय गृह मंत्रालयही हादरून गेले आहे.

Threatening Rahul Gandhi | राहुल गांधी यांना धमकी

राहुल गांधी यांना धमकी

Next

शीलेश शर्मा, नवी दिल्ली
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ठार मारायची धमकी मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये तर घबराट पसरलीच आहे, पण केंद्रीय गृह मंत्रालयही हादरून गेले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्याच पद्धतीने (बॉम्बस्फोटाने) राहुल गांधी यांनाही ठार मारले जाईल, असे तामिळ भाषेतील पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण सामी यांना ही धमकी असलेले पत्र टपालाद्वारे मिळाले.
हे पत्र मिळताच काँग्रेस कार्यालयात खळबळ उडाली व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ताबडतोब केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घ्यायचे ठरविले. त्यानुसार ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, नारायण सामी यांच्यासह इतर नेत्यांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सोमवारी येथे भेट घेतली. राजीव गांधी यांना श्रीपेरुम्बुदूर येथे आत्मघाती बॉम्बस्फोटाने तर इंंदिरा गांधी यांना त्यांच्याच अंगरक्षकांनी ठार मारले होते म्हणून काँग्रेसला काळजी वाटते.
काँग्रेसचे प्रसारमाध्यमांचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी धमकीचे पत्र आल्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि राहुल गांधींची सुरक्षा आणखी वाढवावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. हे पत्र कोणी आणि कोणत्या हेतूने लिहिले याचा शोध घेतला पाहिजे.’’ राजीव गांधी यांची हत्या तामिळनाडूतील निवडणूक प्रचारात झाली होती. राहुल गांधीही तामिळनाडूत प्रचार करीत आहेत. त्यामुळे पत्राकडे गांभीर्याने बघावे लागेल. या पत्रामागे कोणती संघटना आहे याचा शोध गृह मंत्रालयाला लावायचा आहे म्हणून आम्ही थेट गृहमंत्र्यांशी संपर्क साधला, असे सुरजेवाला म्हणाले. लिबरेशन टायगर्स आॅफ
तमिळ इलम (लिटे) पुन्हा सक्रिय झाले आहे का, असे विचारता सुरजेवाला म्हणाले की, ‘‘याचे उत्तर तर राजनाथ सिंहच देऊ शकतात.’’
>उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी काँग्रेसने दिलेल्या या पत्राची गांभीर्याने दखल घेत ताबडतोब कार्यवाहीचे आदेश दिले. राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन सिंह यांनी शिष्टमंडळाला दिले.
>

Web Title: Threatening Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.