न्यायमूर्तींना जिवे मारण्याची धमकी
By admin | Published: August 7, 2015 10:21 PM2015-08-07T22:21:41+5:302015-08-08T09:18:06+5:30
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनची अखेरची याचिका फेटाळणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पीठातील न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे
नवी दिल्ली : मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनची अखेरची याचिका फेटाळणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पीठातील न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीची गांभीर्याने दखल घेत त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
तुघलक रोडवरील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मागच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी धमकीचे हे पत्र मिळाले. न्या. मिश्रा यांना मिळालेले धमकीपत्र गंभीर असून हे बेनामी पत्र पाठवून कुणीतरी खोडसाळपणा केला असावा ही शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे.
न्यायमूर्तींचे खासगी सुरक्षा अधिकारी तपास करीत असताना त्यांना हे पत्र मिळाले. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली. विशेष आयुक्त (कायदा व्यवस्था) लगेच न्यायाधीशांच्या निवासस्थानी गेले आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. न्यायमूर्तींच्या निवासस्थानाभोवतीचे सुरक्षा कवच वाढविण्यासोबतच संपूर्ण नवी दिल्ली क्षेत्रात दहशतवाद प्रतिबंधक सुरक्षा कवायत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याकूब मेमनला गेल्या ३० जुलैला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आल्यानंतर लगेच न्या.मिश्रा आणि त्यांच्या दोन सहकारी न्यायाधीशांची सुरक्षा वाढविण्यात आली होती. तीन न्यायाधीशांनी मेमनने अंतिम क्षणी केलेली याचिका फेटाळली होती.
धमकीचे पत्र पाठविणाऱ्यांनी न्या.मिश्रा यांच्या
घराची ‘रेकी’ केली असावी असा अंदाज आहे. निवासस्थानाबाहेर सुरक्षारक्षक तैनात असून त्यांच्या कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे हे संशयितांना माहिती होते.
एवढेच नाही तर मिश्रा यांच्या घरामागील प्रवेशद्वाराजवळ घनदाट वृक्ष असल्याने येथे पत्र ठेवल्यास सीसीटीव्हीत छायाचित्र टिपले जाणार नाही याचीही त्यांना पुरेपूर कल्पना होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दिल्ली पोलिसांशिवाय केंद्रीय निमलष्करी दलाचे जवानही न्या.मिश्रा यांच्या निवासस्थानावरील बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)