पवारांच्या ‘नितीशकुमार मिसाईल’मुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2016 03:44 AM2016-04-30T03:44:28+5:302016-04-30T03:44:28+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘नंबर वन’ असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवलेला प्रस्ताव बहुतांश विरोधी पक्षांनी फेटाळला आहे.

Threats by Pawar's Nitish Kumar Missile | पवारांच्या ‘नितीशकुमार मिसाईल’मुळे खळबळ

पवारांच्या ‘नितीशकुमार मिसाईल’मुळे खळबळ

Next

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली-भाजपेतर पक्षांची आघाडी उभारायची झाल्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘नंबर वन’ असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवलेला प्रस्ताव बहुतांश विरोधी पक्षांनी फेटाळला आहे.
नितीशकुमार हे सेतूसारखी शक्ती म्हणून काम करणार असेल तर त्यांच्या नेतृत्वात भाजपेतर पक्षांची आघाडी उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खुलेपणाने विचार करेल, अशा आशयाचे विधान पवारांनी केल्यामुळे राजकीय वादळ उभे ठाकले आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा आणि अन्य प्रमुख पक्षांनी असे समीकरण मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रालोआविरुद्ध लढाईचे नेतृत्व राहुल गांधी करणार असून तेच सर्वाधिक सक्षम नेते आहेत, असे काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी स्पष्ट केले.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वात कोणतीही आघाडी स्थापन करण्याची कल्पना फेटाळून लावतानाच बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी अशा आघाडीचा भाग बनणार नसल्याचे नमूद केले.
देशात भाजपविरोधी आघाडी उभारण्यासाठी मुलायमसिंग यादव हेच एकमेव सक्षम नेते आहेत, असे समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी म्हटले. ममता बॅनर्जी नितीशकुमार यांना समर्थन देणार असतील तर ते आश्चर्यच
ठरेल, असा टोलाही त्यांनी हाणला. (वृत्तसंस्था)
>दिल्ली दूर; पाटणाच बरा - राजदचा सल्ला
बिहार सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी राजदने नितीशकुमार यांच्याकडे सोपविली असली तरी त्यांनी बिहारचे व्यापक हित लक्षात घेत दिल्लीकडे नव्हे पाटण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला राजदच्या नेत्यांनी दिला आहे. राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजावण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी याआधीच आपला मनसुबा स्पष्ट केला आहे.
>सोनिया गांधींचीही प्रशंसा...
पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना सोनिया गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. सोनिया गांधी सर्वांना सामावून घेणाऱ्या आणि एकत्र ठेवणाऱ्या नेत्या असून विरोधी पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल अधिक अनुकूलता आहे. राहुल गांधी हे राष्ट्रीय पातळीवर पकड मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे नेतृत्व समोर येत आहे; मात्र निर्णय देणे खूप घाईचे ठरेल. येत्या तीन वर्षांत राहुल कशी कामगिरी करतात यावर ते निर्भर असेल. बहुतांश राज्यांना स्वत: भेटी देणारे ते एकमेव नेते आहेत, अशी पुस्तीही पवारांनी जोडली होती.
पवारांची सारवासारव....
पवारांनी नितीशकुमार यांच्याकडे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व सोपविण्याची भाषा केल्यानंतर विविध घटकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर पवारांनी मी राहुल गांधी यांच्याविषयी काहीही बोललो नाही. केवळ नितीशकुमार हे सक्षम आहेत, असे विधान केले होते, असे सांगत शुक्रवारी सारवासारव केली.
नितीशकुमार यांच्यात भाजपेतर आघाडी उभारण्याची क्षमता असून ते सर्व पक्षांची मोट बांधणारा सेतू ठरतील, या पवारांच्या विधानाचे समर्थन करताना नितीशकुमार यांच्या संजदचे नेते के.सी. त्यागी यांनीही सावध भूमिका घेतली. नितीशकुमार यांच्याकडे क्षमता आहे, एवढेच ते म्हणाले. निवडणुकीत व्यग्र असलेल्या अण्णा द्रमुक, द्रमुक, तृणमूल काँग्रेस यासारख्या प्रादेशिक पक्षांनी पवारांच्या विधानावर भाष्य केलेले नाही.

Web Title: Threats by Pawar's Nitish Kumar Missile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.