भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 08:07 PM2024-10-15T20:07:45+5:302024-10-15T20:09:04+5:30
Indian Planes Update: भारताच्या विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देण्यात आल्याने आज एकच खळबळ उडाली. धमकी देण्यात आलेल्या विमानांमध्ये एअर इंडियाच्या दिल्लीहून शिकागोकडे जाणाऱ्या विमानाचाही समावेश होता.
भारताच्या विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देण्यात आल्याने आज एकच खळबळ उडाली. धमकी देण्यात आलेल्या विमानांमध्येएअर इंडियाच्या दिल्लीहून शिकागोकडे जाणाऱ्या विमानाचाही समावेश होता. दरम्यान, विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी करून सर्व विमानांची आपातकालीन लँडिंग केली आहे.
आज भारताच्या एकूण पाच विमानांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बॉम्ब असल्याची धमकी देणारे मेसेज मिळाले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अनेक विमानतळांवर दहशतवादीविरोधी अभियान सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानांमधील एक विमान अमेरिकेत जाणारं होतं. सोमवारी मुंबईतून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शेकडो प्रवाशी आणि विमान कर्मचाऱ्यांचा अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अधिक तपास केल्यानंतर या धमक्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून ज्या पाच विमानांना बॉम्बने उडवणाची धमकी देण्यात आली होती. त्यामध्ये एअर इंडिया एक्सप्रेसच्या जयपूरवरून अयोध्येला आणि तिथून बंगळुरूला जाणारं विमान (IX765), स्पाईसजेटचं दरभंगा येथून मुंबईकडे जाणारं विमान (SG116), आकासा एअरचं सिलिगुडी येथून बंगळुरूला जाणारं विमान (QP 1373) आणि एअर इंडियाचं दिल्लीहून शिकागोला जाणारं विमान (AI 127) यांचा समावेश आहे. दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाची अयोध्या येथील विमानतळावर सुरक्षा चाचणी करण्यात आली.