अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघा आरोपींना जामीन; हायकोर्टाच्या कामगिरीवर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:30 AM2020-11-12T00:30:34+5:302020-11-12T07:10:43+5:30
हायकोर्टाच्या कामगिरीवर नाराजी
नवी दिल्ली : वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी तसेच अन्य दोन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम जामीन मंजूर केला व त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारले जाण्याच्या प्रकरणांत उच्च न्यायालयांची कामगिरी समाधानकारक नाही असे ताशेरेही सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीकालीन खंडपीठापुढे अर्णब गोस्वामी व अन्य आरोपींच्या जामीन याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी अर्णब गोस्वामी, नितीश सारडा, परवीन राजेश सिंह या तिघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.
अर्णब गोस्वामी यांनी जामिनासाठी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सुनावणीप्रसंगी न्या. धनंजय चंद्रचूड म्हणाले की, जर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेळीच हस्तक्षेप केला नसता तर वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट करण्याच्या दिशेनेच एकूण वाटचाल सुरू राहिली असती. एखाद्याची वृत्तवाहिनी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती पाहू नका. राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करत असेल तर त्या सरकारला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे हे लक्षात घ्या अशीही तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.