नोटाबदलीप्रकरणी तिघांवर गुन्हा
By admin | Published: March 15, 2017 12:00 AM2017-03-15T00:00:47+5:302017-03-15T00:00:47+5:30
नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलून देताना नियम मोडून काळा पैसा पांढरा करून देण्यात मदत करणाऱ्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या कानपूर
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलून देताना नियम मोडून काळा पैसा पांढरा करून देण्यात मदत करणाऱ्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या कानपूर येथील शाखेच्या तीन कर्मचाऱ्यांवर सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. आरोपींनी बँकेची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध कट रचने,
फसवणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. नोटा
बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने
ठरवून दिलेल्या नियमांचा भंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राम नारायण (अकाउंटंट), विनीत सोनकर (हेड कॅशिअर) आणि रजनी कुंदेर अशी आरोपींची नावे आहे.
८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी लागू करण्यात आल्यानंतर जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियम ठरविले होते.
एका दिवसात एका व्यक्तीला फक्त ४ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यात येत होता. त्यासाठी ग्राहकाचे ओळखपत्र घेणे बंधनकारक होते. तथापि, आरोपींनी या नियमांची पायमल्ली केली.
या कटात बँकेचे आणखी काही कर्मचारी सहभागी असू शकतात. त्यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)