काश्मिरात तीन तासांत तीन हल्ले
By admin | Published: April 7, 2015 03:57 AM2015-04-07T03:57:48+5:302015-04-07T03:57:48+5:30
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी यंदाच्या मोसमात राज्यात मोठ्या संख्येत पर्यटक येतील असा विश्वास व्यक्त केला
श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी यंदाच्या मोसमात राज्यात मोठ्या संख्येत पर्यटक येतील असा विश्वास व्यक्त केला असतानाच सोमवारी दहशतवाद्यांनी तीन तासांत तीन हल्ले करून हादरा दिला. या हल्ल्यात प्रामुख्याने पोलिसांना लक्ष्य केले.
शोपिया जिल्ह्यातील एका गावात गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेले तीन पोलीस दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. तिघेही पोलीस नि:शस्त्र होते.
पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार
काश्मीर खोऱ्यात केवळ काही तासांच्या अंतराने पोलिसांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. या घटनेपूर्वी बारामुल्ला जिल्ह्यातील पत्तन भागात पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक गुलाम मस्तफा हे बसने पत्तनला जात असताना दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य बनविले. अन्य घटनेत पुलवामा जिल्ह्यातील त्राल टाऊनशिपमध्ये बंदूकधाऱ्यांनी हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा माजी दहशतवादी रफिक अहमद भट याच्यावर गोळीबार केला.
पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू जिल्ह्यातील सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर रविवारी रात्री पाक रेंजर्सनी गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाकी सैनिकांनी नवापिंड आणि आर.एस.पुरा सेक्टरमधील चौक्यांवर लहान शस्त्रांनी काही काळ गोळीबार केला. (वृत्तसंस्था)