महाराष्ट्रातील १४ मान्यवरांना पद्म सन्मान; तिघांना पद्मभूषण, ११ जणांना पद्मश्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 05:46 IST2025-01-26T05:46:01+5:302025-01-26T05:46:59+5:30
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.

महाराष्ट्रातील १४ मान्यवरांना पद्म सन्मान; तिघांना पद्मभूषण, ११ जणांना पद्मश्री
चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर या तीन मान्यवरांसह १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार तर मारूती चितमपल्ली, विलास डांगरे, चैतराम पवार यांच्यासह देशभरातील ३० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यात गोव्याच्या लिबिया लोबो सरदेसाई यांचाही समावेश आहे.
केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हा पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात.
केंद्र सरकारने शनिवारी कला, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, मेडिकल, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील ३० जणांच्या नावाची घोषणा पद्मश्री विजेते म्हणून केली आहे.
नागपूरचे पक्षीतज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण, डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय आणि चैत्राम देवचंद पवार यांना पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाणारे ९२ वर्षांचे मारूती चितमपल्ली यांची वन, वन्यप्राणी आणि पक्षीशास्त्रावर आधारित २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राज्यातील विविध अभयारण्यात उत्तम कार्य केले आहे. नागपूरचे होमियोपॅथी डॉक्टर विलास डांगरे हे ७० वर्षांचे असून मागील ५० वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचा अत्यल्प शुल्क आकारून उपचार करीत आहेत. नागपुरात त्यांनी एक लाखापेक्षा जास्त रूग्णांवर उपचार केले आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अविस्मरणीय भूमिकांना रुपेरी पडदा गाजवणारे ख्यातनाम कलावंत अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाला.