भयंकर! खेळता खेळता मोबाईल बॅटरीचा झाला ब्लास्ट; चिमुकल्यांच्या शरीरात घुसले तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 01:01 PM2021-10-29T13:01:28+5:302021-10-29T13:05:34+5:30
Three child injured due to mobile battery blast : खेळता खेळता मोबाईलच्या बॅटरीचा ब्लास्ट झाल्याची भयंकर घटना घडली आहे
नवी दिल्ली - स्मार्टफोन हा सर्वांच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण त्याचा वापर हमखास करतो. सध्या लहान मुलांना देखील मोबाईलचं प्रचंड वेड असलेलं पाहायला मिळतं. पण चिमुकल्यांच्या हातात फोन देणं महागात पडू शकतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. खेळता खेळता मोबाईलच्या बॅटरीचा ब्लास्ट झाल्याची भयंकर घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांच्या हातातच बॅटरीचा स्फोट झाला आणि त्याचे तुकडे त्यांच्या शरीरामध्ये घुसले आहेत. मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यात ही घटना घडली.
मोबाईल बॅटरीच्या ब्लास्टमुळे तीन लहान मुलं गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघंही खेळत असताना मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्या तिघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र श्रीवास्तव यांच्या घराजवळ हा ब्लास्ट झाला. त्यांचा 11 वर्षीय मुलगा सुमित बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता क्लासवरून घरी आला. त्यावेळी त्याला खेळता खेळता घरामध्ये मोबाईलची एक जुनी बॅटरी सापडली.
मोबाईलच्या बॅटरीचे तुकडे हे मुलांच्या शरीरामध्ये घुसले
सुमित खेळत असतानाच त्याची चुलत भावंडं गौरव खरे आणि रमन खरे हे तिथे आहे. ते दोघेही त्याच्यासोबत मोबाईल बॅटरीसोबत खेळत होते. खेळता खेळता त्याने एक तार घेतली आणि बॅटरीच्या पॉईंटला दोन्ही बाजुला लावली. ही तार लावताच जोरदार ब्लास्ट झाला आणि मोबाईलच्या बॅटरीचे तुकडे हे मुलांच्या शरीरामध्ये घुसले. मोठा आवाज ऐकून घरातील मंडळी धावत आली. तेव्हा त्यांना मुलं जखमी अवस्थेत पडलेली दिसली. मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर सध्या उपचार करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.