जिथे होळी पेटली, तिथेच चिता पेटवण्याची वेळ; तीन चिमुरडी होरपळल्यानं गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:25 IST2021-03-29T18:21:37+5:302021-03-29T18:25:32+5:30
तीन चिमुरड्यांच्या निधनामुळे शोककळा; एक चिमुरडा गंभीर जखमी

जिथे होळी पेटली, तिथेच चिता पेटवण्याची वेळ; तीन चिमुरडी होरपळल्यानं गावावर शोककळा
गया: देशभरात होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र बिहारमधल्या बोधगयामध्ये होळीच्या उत्सवाला गालबोट लागलं. होळी पेटवली जात असताना ४ चिमुरडी मुलं होरपळली. यातील तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनकोसी गावात रविवारी रात्री होळी पेटवण्यात आली. या आगीत चार चिमुरडी होरपळली. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. रोहित कुमार (१२ वर्षे), नंदलाल मांझी (१३ वर्षे) आणि उपेंद्र कुमार (१२ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. तर मोराटाल पंचायतीच्या उपसरपंच गीता देवी यांचा मुलगा रितेश कुमार (१२ वर्षे) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
होळी पेटवण्यात आल्यानंतर काही मुलं पेटली लाकडं घेऊन गावाच्या समोर आलेल्या डोंगरावर गेले होते. यातील ४ मुलं डोंगरावर फार पुढे गेली. यावेळी मुलांपैकी कोणीतरी पेटतं लाकूड झाडीत फेकलं. त्यामुळे झाडीला आग लागली. वर गेलेल्या मुलं अडकून पडली. आगीत होरपळल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला. आज या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात मुलांच्या कुटुंबातील कोणीही एफआयआर दाखल केलेला नाही.