टीव्हीच्या स्फोटात तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:37 PM2019-04-03T13:37:42+5:302019-04-03T13:39:16+5:30
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. बदायू जिल्ह्यातील एका गावामध्ये टीव्हीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात घरातील 3 मुलांचा मृत्यू झाला असून 1 जण बचावला आहे
बदायू - उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. बदायू जिल्ह्यातील एका गावामध्ये टीव्हीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात घरातील 3 मुलांचा मृत्यू झाला असून 1 जण बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
बदायू जिल्ह्यातील कुठौली गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी माहिती दिली की, कुठौली गावामध्ये एका कुटुंबातील चौघे भावंडे रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत बसली होती. त्यादरम्यान अचानक टीव्हीमध्ये स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, 3 मुलांचा जागीच मृत्यू झाला. त्यातील 1 जण पळाल्यामुळे त्याचा जीव वाचला.
पोलीस निरीक्षक ओ. पी गौतम यांना कुठौली गावात स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार या 3 मुलांचा मृत्यू हा श्वास कोंडल्यामुळे झाला असल्याचं कळतंय. पोस्टमार्टमनंतरच मृत्यू कसा झाला याचे कारण स्पष्ट होईल. पोलीस या घटनेची चौकशी करत असून टीव्हीमध्ये स्फोट कसा याची कारणे शोधली जात आहेत. मृतांमध्ये 8 वर्ष, 6 वर्ष आणि 4 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे.