तीन सहका-यांची जवानाकडून हत्या
By admin | Published: October 9, 2014 03:18 AM2014-10-09T03:18:18+5:302014-10-09T03:18:18+5:30
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबलने निमलष्करी दलाच्या शिबिरात आपल्या तीन सहकाऱ्यांची गोळी झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना
कांचीपुरम : येथे स्थित असलेल्या कलपक्कम अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबलने निमलष्करी दलाच्या शिबिरात आपल्या तीन सहकाऱ्यांची गोळी झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात अन्य दोन जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी हेड कॉन्स्टेबल विजय प्रताप सिंह (४५) याने अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या सीआयएसएफच्या शिबिरात नऊ एमएमच्या कार्बाईनने गोळ्या झाडून सहायक उपनिरीक्षक गणेशन व हेड कॉन्स्टेबल सुब्बुराज आणि मोहनसिंग यांची हत्या केली.
या घटनेमुळे अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील कामकाजावर कुठलाही विपरीत परिणाम झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कलपक्कम शहरात असलेल्या सीआयएसएफच्या शिबिरात सकाळच्या कामकाजाची सुरुवात होत असतानाच ही घटना घडली.
सकाळी जवानांना त्यांची शस्त्रे दिल्यानंतर लगेचच त्याने हा हल्ला केला. त्यामागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत, असे पोलीस अधीक्षक सी. विजयकुमार यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात जखमी झालेले सहायक उपनिरीक्षक प्रताप सिंग व हेड कॉन्स्टेबल गोवर्धन सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिल्ली मुख्यालयातील प्रवक्ते हेमेंद्र सिंग यांनी, सिंग हा बराच अनुभवी जवान असून तो १९९० साली या दलात दाखल झाल्याचे सांगितले. हेड कॉन्स्टेबलची बढती मिळाल्यानंतर तो या अणुऊर्जा प्रकल्पात आला होता. (वृत्तसंस्था)