भाजप खासदाराच्या घरावर तीन क्रूड बॉम्बने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 06:02 AM2021-09-09T06:02:39+5:302021-09-09T06:03:23+5:30
खासदार अर्जुनसिंह यांच्या घरी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या निवासस्थानी व परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार अर्जुनसिंह यांच्या भातपारा येथील निवासस्थानावर बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी तीन क्रूड बाॅम्बने हल्ला केला आहे. या घटनेत काही जण जखमी झाल्याचा दावा अर्जुनसिंह यांनी केला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हल्ल्याचा राज्यपाल जगदीप धनकड यांनी तीव्र निषेध केला आहे.
खासदार अर्जुनसिंह यांच्या घरी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या निवासस्थानी व परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात नेमके किती जखमी झाले, याचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. राज्यपाल जगदीप धनकड यांनी म्हटले आहे की, खासदार अर्जुनसिंह यांच्यावर झालेल्या क्रूड बॉम्बहल्ल्याने पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करणे अपेक्षित
आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अर्जुनसिंह यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर या भागातील स्थिती आणखी बिघडली होती.