काश्मिरातील मृतांची संख्या तीनवर, लष्कराचा गोळीबार; भाजपा-पीडीपी यांच्यात वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:56 AM2018-02-01T01:56:07+5:302018-02-01T01:57:06+5:30
काश्मीरमधील शोपियां येथे लष्कराने शनिवारी दुपारी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या युवक बुधवारी मरण पावला. या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे शोपियांमध्ये तणाव वाढला आहे.
श्रीनगर : काश्मीरमधील शोपियां येथे लष्कराने शनिवारी दुपारी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या युवक बुधवारी मरण पावला. या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे शोपियांमध्ये तणाव वाढला आहे.
शोपियांतील नारपोरा गावाचा रहिवासी असलेला रईस अहमद गनी हा युवक गोळीबारात गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या रईसचा आज सकाळी मृत्यू झाला.
शोपियां येथील गवानपोरा गावात संतप्त जमावाने शनिवारी जोरदार दगडफेक सुरु केली. एका जखमी अधिकाºयाला दगडाने ठेचून मारण्याचा व लष्कराची वाहने जाळण्याचा प्रयत्नही जमावाने केला. या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार व सहा जण जखमी झाले होते. त्यामुळे लष्कराच्या १०, गढवाल युनिट व त्यातील दोन अधिकाºयांविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)
फुटीरतावाद्यांचे धरणे
पोलिसांच्या कृतीचा भाजपाने निषेध केला, तर पीडीपीने मात्र पोलिसांच्या कृतीचे जोरदार समर्थन केले. शोपियांमध्ये गोळीबारानंतर सलग चौथ्या दिवशी आज बंद पाळण्यात आला. गोळीबारात नागरिक मरण पावल्यामुळे लष्कराच्या निषेधार्थ श्रीनगर येथील ऐतिहासिक जामा मशिदीच्या बाहेर फुटीरवाद्यांनी धरणे धरले आहे.