तीन तलाक दुरुस्ती विधेयक आता येणार हिवाळी अधिवेशनात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 03:39 AM2018-08-11T03:39:03+5:302018-08-11T03:41:15+5:30
सरकार विधेयकाबाबत वटहुकूम काढण्याच्या विचारात असल्याचे समजते.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घाईघाईत मंजूर केलेले तीन तलाकशी संबंधित दुरुस्ती विधेयक शुक्रवारी राज्यसभेत मांडले जाणार होते. पण राफेल खरेदी व्यवहाराच्या चौकशीसाठी संसदीय समितीच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाल्याने मोदी सरकारने प्रतिष्ठा पणाला लावलेले हे विधेयक, आता हिवाळी अधिवेशनापर्यंत पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे सरकार विधेयकाबाबत वटहुकूम काढण्याच्या विचारात असल्याचे समजते.
दुरुस्ती विधेयकात आरोपीला जामीन मंजूर करण्याचा अधिकार दंडाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. न्यायालयाच्या संमतीने आपसात समझोता करण्याची तरतूदही त्यात आहे. तसेच पीडित महिलेच्या फक्त रक्तसंबंधातील आप्तालाच या संबंधात एफआयआर दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
हे विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करवून घेण्याचा मोदी सरकारचा आग्रह होता. पण राफेल सौद्याच्या चौकशीवरून गदारोळ झाल्याने दुपारी अडीच वाजेपर्यंत कामकाज तहकूब झाले. यानंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज एका दिवसाने वाढवण्याची चर्चा होती.
त्यासाठी राजनाथ सिंह, अनंतकुमार, अमित शाह, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नकवी यांची बैठक झाली. त्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली.
>सभापतींची घोषणा
कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडूंनी तीन तलाक विधेयक आज मंजूर करण्याबाबत सर्व पक्षांची सहमती नसल्याने ते हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाईल, अशी घोषणा केली.