तीन मजले, पाच कळस, दुप्पट आकार, जास्त उंची, तीन वर्षांत मंदिर तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 04:49 AM2020-08-02T04:49:07+5:302020-08-02T04:49:44+5:30
तीन वर्षांत मंदिर तयार। वास्तुरचनाकार सोमपुरा
अयोध्या : अयोध्येतील बहुप्रतीक्षित राममंदिराचा आराखडा जवळपास निश्चित झाला असून, येथे उभारण्यात येणारे राममंदिर तब्बल तीन मजली असेल, गर्भगृहाच्या बरोबर माथ्यावर कळस असेल, मंदिराला पाच कळस असतील आणि मंदिराची उंचीही पूर्वीच्या तुलनेत बरीच जास्त असेल, अशी माहिती मंदिराचे वास्तुरचनाकार चंद्रकांत सोमपुरा यांनी दिली.
चंद्रकांत सोमपुरा मूळचे अहमदाबाद येथील असून, मंदिरांच्या आराखड्यातले ते तज्ज्ञ मानले जातात. देशभरात आतापर्यंत त्यांनी दोनशेपेक्षाही जास्त मंदिरांचे आराखडे तयार केले आहेत. सोमपुरा यांच्या मते नागर शैलीतरील हे मंदिर पूर्णपणे तयार होण्यास साधारण तीन ते साडेतीन वर्षे लागतील; जे पूर्णत: वास्तुशास्त्रानुसार असेल. मंदिराच्या जुन्या आराखड्यानुसार ते दोन मजली होणार होते, त्यात तीन मंडप आणि उंची १४१ फूट राहणार होती. मात्र, गेल्या वर्षीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंदिराच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून, आता ते तीन मजली असेल, कळसांची संख्या पाच असेल आणि उंचीही पूर्वीच्या तुलनेत बरीच जास्त असेल. पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत नव्या मंदिराचा आकारही आता जवळपास दुप्पट असेल.
सोमपुरा म्हणतात, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी तीस वर्षांपूर्वी राममंदिराचा आराखडा तयार करण्यास मला सांगितले होते; पण त्यावेळी हे काम अतिशय कठीण होते.
१९९० मध्ये पहिल्यांदा मी अयोध्येला गेलो, त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव सोबत काहीही, अगदी मापाचा टेप न्यायलाही परवानगी नव्हती. त्यामुळे पावलांचा उपयोग करूनच त्यावेळी मी माप घेतले होते. १९९० मध्येच अयोध्येत दगडी कोरीव कामांसाठी एक युनिट स्थापन केले होते.
ही आहेत देशातील
सात प्रमुख राममंदिरे
भारतात रामाची काही अतिशय प्राचीन आणि सुंदर मंदिरे आहेत. अयोध्येत राममंदिराचे निर्माण सुरूहोत असताना या प्राचीन आणि श्रद्धाळूंसाठी अतिशय मानाचे स्थान
असणाऱ्या मंदिरांची ही ओळख.
त्यातील एक म्हणजे नाशिकचे
काळाराममंदिर. जिथे
भाविक देशभरातून
नियमित येत असतात.
रामस्वामी मंदिर, तामिळनाडू
कुंभकोणम येथील हे रामाचे मंदिर. देखणं. प्रसन्न आहे.
राम मंदिर, ओडिसा
भुवनेश्वरच्या नानागेट चौकात हे राम मंदिर आहे. स्थानिकांची येथे दर्शनाला मोठी गर्दी असते.
रघुनाथ मंदिर, जम्मू
जम्मूच्या पक्की ढाकी या भागात हे रघुनाथमंदिर आहे. डोग्रा राजवटीत महाराज गुलाब सिंग यांनी
1835
मध्ये हे मंदिर बांधल्याची नोंद आहे.
रामचौरा मंदिर, बिहार
बिहारमधील हाजीपूरमधील रामचुरा मंदिरही अतिशय प्रसिद्ध आहे.
श्री रामराजा मंदिर, ओरछा
मध्य प्रदेशात ओरछा येथे, झाशी- टिकमगढ मार्गावर हे मंदिर आहे. जे ओरछा मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. रामाच्या भारतातील सर्वाधिक पुरातन मंदिरांत या मंदिराची नोंद आढळते.
सीता रामचंद्रस्वामी मंदिर,
भद्रचलम
तेलंगणातील भद्रचलम गावातील हे सीता रामचंद्रस्वामी मंदिरही अतिशय प्रसिद्ध आहे. भद्र या रामाच्या नावावरूनच या गावाचे नाव भद्रचलम आहे, असे म्हणतात.
कोदंडराम
मंदिर,
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशातील वोन्टीमिट्टा गावी हे कोदंडराम मंदिर आहे. स्थानिक भाषेत हे मंदिर ज्यांनी बांधले त्याविषयी अनेक आख्यायिका आहेत.