लोकपालाच्या शर्यतीत सर्वोच्च न्यायालयाचे तीन माजी न्यायाधीश
By Admin | Published: January 15, 2016 02:08 AM2016-01-15T02:08:02+5:302016-01-15T02:08:02+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे तीन माजी न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे एक माजी मुख्य न्यायाधीश, यूजीसीचे एक माजी सदस्य आणि माहिती आयुक्तासह १६ जणांनी लोकपालच्या अध्यक्षपदासाठी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे तीन माजी न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे एक माजी मुख्य न्यायाधीश, यूजीसीचे एक माजी सदस्य आणि माहिती आयुक्तासह १६ जणांनी लोकपालच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केले आहेत.
सुभाष अग्रवाल यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जावर माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांच्या आदेशानंतर कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) अर्जदारांची यादी जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्या. ज्ञान सुधा मिश्रा, न्या. सी.के. प्रसाद आणि न्या. बलवीरसिंग चौहान यांना या पदासाठी नामनिर्देशित केले होते. हे तिघेही आता सेवानिवृत्त झाले आहेत.
झारखंड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. एम.करपागा विनागम, युजीसीचे माजी सदस्य आणि माजी माहिती आयुक्त एम.एम.अन्सारी आणि माहिती आयुक्त श्रीधर आर्चायुलु यांनी लोकपालपदासाठी थेट अर्ज केले आहे.
याशिवाय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही अर्जदारात समावेश आहे.
निवड प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल
-भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईसाठी स्थापित लोकपालमधील विविध पदांसाठी आलेल्या अर्जदारांची नावे जाहीर केल्याने निवड प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढेल,असे मत माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी यासंदर्भात निर्देश देताना व्यक्त केले होते.
-एवढ्या संवेदनशील पदांसाठी अर्ज करणाऱ्यांची नावे सार्वजनिक होतील तेव्हाच लोक निवड समितीसमक्ष अनेक तथ्यांचा खुलासा करू शकतील,असेही त्यांचे म्हणणे होते.
-डीओपीटीने १७ जानेवारी २०१४ रोजी लोकपालच्या अध्यक्षाचे एक पद आणि अन्य आठ पदांसाठी अर्ज मागितले होते.