मणिपूरमध्ये ३ सरकारी कार्यालयांना आग
By admin | Published: December 24, 2016 01:39 AM2016-12-24T01:39:21+5:302016-12-24T01:39:21+5:30
मणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, शुक्रवारी कामजोंग जिल्ह्यातील
इम्फाळ : मणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, शुक्रवारी कामजोंग जिल्ह्यातील कार्यालयासह तीन सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली.
कामजोंगचे उपायुक्त आर्मस्ट्रोंग पेम यांनी सांगितले की, भल्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांनी उपविभागीय कार्यालयांना आग लावली. कामजोंग येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन बाकी असल्यामुळे हे कार्यालया सध्या तात्पुरत्या स्वरूपात एसडीओ कार्यालयासोबत सुरू होते.
उखरूल जिल्ह्यातून वेगळे बनविलेल्या कम्जोंग जिल्ह्याला मोठा विरोध होत आहे. तंगखूल नागा लोंग आणि संयुक्त नागा परिषद यांचा या निर्मितीला विरोध आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य एका घटनेत उखरूल जिल्ह्यात काही अज्ञात लोकांनी मिनी सचिवालयाच्या दोन खोल्यांना आग लावली.
मोदींनी हस्तक्षेप करावा - मेरी कोम
नवी दिल्ली : मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या बॉक्सर मेरी कोम यांनी केली आहे. मणिपूरमध्ये ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सरकार जबाबदारी झटकू शकत नाही : रिजिजू
इंफाळ : नागा समुदायाकडून ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे जे संकट निर्माण झाले आहे त्याची जबाबदारी राज्य सरकारला झटकता येणार नाही, असा संदेश केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी राज्यातील इबोबी सरकारला दिला आहे, तर कुणालाही राजकीय लाभ घेऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सोबत काम करतील असे सांगून येथे एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राज्य सरकार नाकेबंदी संपवू शकलेले नाही. ही परिस्थिती पूर्ववत व्हायला हवी, कारण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
मणिपूरमध्ये आर्थिक नाकाबंदी : केंद्राने घेतला आढावा
इम्फाळ : मणिपूरमध्ये महामार्गावर होत असलेल्या आर्थिक नाकाबंदीचा केंद्र सरकारने आढावा घेतला आहे. ही चिंताजनक परिस्थिती संपविण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, असे आवाहन केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी केले आहे. राज्यात सात नवे जिल्हे बनविण्यात आले आहेत. त्याला संयुक्त नागा परिषद विरोध करीत आहे.
एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू, मुख्यमंत्री ओ इबोबी सिंह आणि केंद्र व मणिपूर सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांनी सहभाग घेतला. केंद्राचे दूूत म्हणून रिजिजू हे एक दिवसाच्या मणिपूर दौऱ्यावर आलेले आहेत.
नाकेबंदी संपविण्यासाठी आणि राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी मणिपूर सरकारने आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडावीत, असे ते म्हणाले. १ नोव्हेंबरपासून नाकेबंदी सुरू असून, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २ वर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.