तीनशे खासदार पहिल्याच वेळी आले निवडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:16 AM2019-05-25T05:16:32+5:302019-05-25T05:17:02+5:30
अनेकांचा व्यवसाय समाजसेवा, शेती
एस. के. गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेत ३०० खासदार पहिल्याच वेळी निवडून आले आहेत. यापैकी बव्हंशी खासदारांचा व्यवसाय समाजसेवा आणि शेती आहे. तीन टक्के कलाकार आणि सर्वांत कमी २ टक्के शिक्षक संसदेत पोहोचले आहेत. लोकसभेच्या ७८ जागांवर महिला आणि ४६४ जागांवर पुरुष विजयी झाले आहेत.
सतराव्या लोकसभेवर निवडून आलेल्या ३९४ खासदारांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले आहे.
पहिल्या लोकसभेत महिला खासदारांचे प्रमाण ५ टक्के होते; ते या वेळी १४ टक्के झाले आहे. तथापि, अन्य देशांच्या तुलनेत भारताच्या संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व अजूनही कमीच आहे. अन्य देशांतील संसदेतील महिलांचे प्रतिनिधित्व बघता रवांडामध्ये ६१ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ४३ टक्के, ब्रिटनमध्ये ३२ टक्के, अमेरिकेत २४, तर बांगलादेशात २१ टक्के आहे. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण ७१६ महिला उमेदवार रिंगणात होत्या. यापैकी ७८ महिला लोकसभेवर निवडून आल्या आहेत. सोळाव्या लोकसभेत ६२ महिला खासदार होत्या.
या वेळी लोकसभेवर निवडून आलेल्या पुरुष खासदारांचे वय महिला खासदारांच्या तुलनेत ६ वर्षे अधिक आहे. पुरुष खासदारांचे सरासरी वय ५४ वर्षे, तर महिला खासदारांचे वय सरासरी ४८ वर्षे आहे. नव्या लोकसभेत ४२ टक्के खासदारांचे वयोमान ५६ ते ७० वर्षांदरम्यान आहे, तर ४१ टक्के खासदारांचे वय ४१ ते ५५ वर्षांदरम्यान आहे. बारा टक्के खासदारांचे वय २५ ते ४० वर्षांदरम्यान आहे. सत्तरपेक्षा अधिक वयाचे ६ टक्के खासदार
आहेत.
शिक्षण बारावी ते पीएच.डी.
सतराव्या लोकसभेते ४३ टक्के खासदार पदवीधर, २७ टक्के बारावी उत्तीर्ण, २५ टक्के पदव्युत्तर असून ४ टक्के खासदार पीएच.डी. झालेले आहेत.
397 खासदार राष्ट्रीय पक्षांचे...
या वेळी निवडून आलेल्या खासदारांपैकी ३९७ खासदार राष्ट्रीय पक्षांचे आहेत. यापैकी भाजपचे ३०३, काँग्रेसचे ५२ आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे २२ खासदार निवडून आले आहेत. या वेळी १९७ खासदार दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. मागच्या लोकसभेत १६९ खासदार दुसऱ्यांदा निवडून आलेले होते.
पीआरएस इंडियाच्या संकलित माहितीनुसार अनेक खासदारांनी एकापेक्षा अधिक व्यवसाय असल्याचे सांगितले. ३८ टक्के खासदारांनी आपला व्यवसाय राजकारण आणि समाजसेवा असल्याचे घोषित केलेले आहे.
39% खासदार शेती करतात, तर २३ टक्के खासदार व्यवसाय करतात. फक्त ४ टक्के खासदार व्यवसायाने वकील
आहेत.