अमेरिकेच्या संसदेत तीन भारतीय वंशाचे सदस्य
By Admin | Published: November 9, 2016 08:11 PM2016-11-09T20:11:14+5:302016-11-09T20:11:14+5:30
अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे.
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 - अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे. वॉशिंग्टनमधून प्रमिला जयपाल प्रतिनिधी सभेवर निवडून आल्या आहेत. तर कमला हॅरिस कॅलिफोर्नियामधून सिनेटर म्हणून निवडून आल्या आहेत त्याबरोबरच राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले आहेत.
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकन सिनेटर म्हणून निवडून येत इतिहास रचला आहे. सिनेटर म्हणून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक ठरल्या आहेत. कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियाच्या अॅटॉर्नी जनरल म्हणून काम पाहिले आहे. त्यांची आई भारतीय असून, वडील जमैकातील आहेत. 51 वर्षांच्या हॅरिस यांनी निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या लोरेटा सँचेझ यांना 34.8 टक्क्यांच्या मताधिक्याने मात दिली.
त्याबरोबरच प्रमिला जयपाल यांनी वॉशिंग्टनमधून विजय मिळवला आहे. त्या प्रतिनिधी सभेमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.तर राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले भारतीय वंशाचे पहिले नागरिक ठरले आहेत. त्याबरोबरच लतिका मेरी थॉमस, रोहित खन्ना, रोहित खन्ना आणि एमी बेरी या भारतीय वंशाच्या उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय अद्याप झाला नव्हता.