जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 09:07 PM2018-02-02T21:07:30+5:302018-02-02T21:08:17+5:30
जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर एक जवान जखमी झाला आहे.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर एक जवान जखमी झाला आहे. माछिल सेक्टरमधल्या लष्करी तळावर अचानक बर्फाच्छादित डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेत तीन जवानांना प्राण गमावावे लागले आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर काश्मीरमधील कुपवाड्यामधीलच तंगधारमध्ये हिमस्खलनात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये काही पर्यटकांचा समावेश होता. पर्यटकांची गाडी कुपवाड्याहून करनाह येथे येत असताना ही दुर्घटना घडली होती. हिमस्खलनात पर्यटकांची गाडी बर्फाखाली गाडली गेली होती. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले होते.
#FLASH J&K: Three Army personnel lost their lives, 1 injured, after an avalanche hit an Army post in Kupwara's Machil Sector. pic.twitter.com/S0MFh2rolk
— ANI (@ANI) February 2, 2018
तंगधारच्या साधना टॉपजवळ ही घटना घडली होती. दोन जणांचे मृतदेह हाती लागले होते. त्यात 10 वर्षांच्या मुलाचा समावेश होता. ज्या कुपवाडा-करनाह मार्गावर ही दुर्घटना घडली तो मार्ग बर्फवृष्टीमुळे हिवाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये बंद असतो. सुलेमान (10) आणि टॅक्सी चालक झहून अहमद या दोघांचे मृतदेह काल सापडले होते.
रात्रीच्या वेळी मदतकार्य थांबवण्यात आले होते. दुर्घटना अत्यंत दुर्गम भागात घडल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी असून, बर्फवृष्टीही सुरू आहे. हिवाळ्यात काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडत असतात. भारताने आपल्या अनेक जवानांना हिमस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये गमावले आहे.